Join us

Kharif Season : यंदा नाशिक जिल्ह्यात ९४ हेक्टरवर भात शेती, तर जळगावात कपाशीचा रेकॉर्ड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:06 PM

नाशिक कृषी विभागातील चार जिल्ह्यांमध्ये २० लाख २४ हजार २३६ हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होणार

नाशिक :नाशिक कृषी विभागातील चार जिल्ह्यांमध्ये २० लाख २४ हजार २३६ हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होणार असून, शेतक-यांकडून पीक लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याचे काम जोमात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांच्या उपस्थितीत खरिपाच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आला. यात निकृष्ट विवाणे शोधण्यासाठी पथके कार्यान्वित केली जाणार असल्याचे ठरले, 

यंदा सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यात ७ लाख ३९ हजार ५८३ हेक्टरवर होईल. यात ७० टक्के लागवड कापसाची असेल, तर नाशिक जिल्ह्यात ६ लाख २९ हजार ६१९ हेक्टरवर, धुळे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ४६४ हेक्टरवर, तर नंदुरबार जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ५७० हेक्टरवर खरिपाची लागवड होईल. विभागात २८ हजार ७९० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली असून, ११ मेअखेर केवळ २,६१७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. साडेपाच हजार क्विंटल बियाण्यांचा बंफर स्टॉकही विभागासाठी उपलब्ध असेल. ते बियाणे अडचणीच्या काळात किंवा टंचाई असताना वापरले जातील. 

मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होण्यापूर्वी शेतकरी, तसेच कृषी विभागास खरिपाचे वेध लागतात. त्यानुसार खते व बियाण्यांची मागणी करण्यात येत असते. पुढील आठवड्यात विभागात अजून १० हजार क्विंटल बियाण्यांची खेप पोहोचेल. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पेरा यंदा मक्याचा असेल. दोन लाख ४२ हजार हेक्टरवर मका, तर ९४ हजार हेक्टरवर भातशेती फुलेल, रबी हंगामात बंफर लागवडीने ज्वारीची कोठारे भरली होती; परंतु खरिपात नाशिक जिल्ह्यात केवळ ६०० हेक्टरवर ज्वारीची लागवड केली आईल, तर नाशिक जिल्ह्यासाठी १ लाख २५ हजार क्विंटल बियाणे लागेल. 

धुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढणार

धुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा यंदाही वाढलेला दिसेल. २ लाख १९ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाईल. त्या खालोखाल मका ६७ हजार ७२४ क्षेत्रावर, तर संकरित व सुधारित ज्यारी ६ हजार ५०० हेक्टरवर केली जाईल. तसेच यंदा सोयाबीनचे क्षेत्रही वाढलेले असेल. 

नंदुरबारमध्येही भात पिकणार

नाशिकप्रमाणेच नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या संख्येने आदिवासीबहुल गावे आहेत. तेथेही भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या जिल्ह्यात २४ हजार ५२० हेक्टरवर भात पीक घेतले जाईल, तर कापूस लागवडीतूनही शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रयल करेल. येथे कापसाची लागवड तब्बल १ लाख ३१ हजार हेक्टरवर होईल. मका ३२ हजार, तर सोयाबीनची लागवड ३५ हजार हेक्टरवर होईल.

जळगावात कपाशीचा रेकॉर्ड होणार

कापूस अनु केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदाही कापूस लागवडीतून उच्चांक साधला जाईल. तब्बल ५ लाख ५२ हजार ०७७ हेक्टरवर कापसाचे प्रस्तावित क्षेत्र दर्शविण्यात आले असून, त्या खालोखाल मका ९८ हजार, संकरित ज्वारी १० हजार, तर सुधारित ज्वारीचे क्षेत्र १९ हजार २०० हेक्टर असेल. 

टॅग्स :खरीपशेतीनाशिकशेती क्षेत्र