Join us

चंद्रपूरच्या खेमजईला सीताफळाचे गाव म्हणून नावलौकिक, पाच हजार वृक्षांची लागवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 5:16 PM

२० वर्षांपूर्वी खेमजईला 'सीताफळाचे गाव अशी ओळख होती. ते गतवैभव पुन्हा परत आणण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला.

चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खेमजई हे गाव विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी चर्चेत असते. २० वर्षांपूर्वी खेमजईला 'सीताफळाचे गाव अशी ओळख होती. सीताफळाची झाडे नामशेष झाली अन् ओळख मिटली. मात्र, ते गतवैभव पुन्हा परत आणण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला. त्यासाठी मनरेगा योजनेचा आधार घेऊन गावात तब्बल पाच हजार सीताफळांची झाडे लावली आहेत.

खेमजई गावाच्या हद्दीत महसूल जमीन मोठ्या प्रमाणात आहे. या जागेवर खुरटे जंगल आणि २०-२५ वर्षांपूर्वी शेकडो सीताफळाची झाडे होती. ग्रामपंचायतीकडून दरवर्षी सीताफळांचा लिलाव व्हायचा. त्यातून गावाला उत्पन्न मिळत होते. मात्र, त्या जागेत चुनखडी दगड लागल्याने खनिज उत्खनन झाले. परिणामी, सीताफळाची झाडे नामशेष झाली. सीताफळापासून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही बंद झाले. दरम्यान, २०२१ मध्ये गावात ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाली. नव्या कमिटीने सीताफळ लागवड करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी मनरेगा योजनेची मदत घेतली, पाच हजार सीताफळाची झाडे लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी मनरेगा विभागाने तांत्रिक व आर्थिक मंजुरी दिली. त्यानुसार सीताफळाची लागवड करून संगोपनाची जबाबदारी उचलल्या जात आहे. त्यामुळे खेमजईला 'सीताफळाचे गाव' म्हणू पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ शकते. लोकसहभागातून नियोजन हे ध्येय लवकरच गाठ. असा विश्वास मार्गदर्शक रमेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

गावकऱ्यांना रोजगार

सीताफळांची झाडे लावल्यानंतर ग्रामपंचायतीने मनरेगा कामाची मागणी केली. प्रशासनानेही सहकार्य केल्याने या कामावर आता गावातील ७० पेक्षा जास्त महिला व पुरुष मजूर म्हणून कार्यरत आहेत. गावातील लोकांना रोजगार मिळाल्याने शासनाच्या मनरेगा योजनेची महती पटली. नागरिक उत्साहाने वृक्ष संगोपनाची कामे करीत असल्याचे दिसून आले.

गावातील सामाजिक मंडळांचेही श्रमदान

काही वर्षात गावाचा चेहरामोहरा बदलणार असल्याने विकास ग्रुप, गुरुदेव सेवा मंडळ, उमेद महिला बचतगट, क्रीडा व युवक मंडळांचे सदस्य श्रमदान करीत आहेत. मनरेगा रोजगारसेवक संपावर गेल्याने काही दिवस कामे बंद होती. अशावेळी सीताफळाच्या झाडांना पाणी देण्याचे काम गावातील नागरिक व महिला बचतगटांनी श्रमदानातून केले. 

ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा 

सरपंच मनीषा चौधरी म्हणाल्या की, शासनाची योजना ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. सीताफळ लागवड करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कमिटीने घेतला. मात्र, वासाठी लोकसहभाग मिळाला ही बाब आत्मविश्वास वाढविणारी आहे. तर उपसरपंच चंद्रहास मोरे म्हणाल्या की, गावकऱ्यांना रोजगार, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ आणि पर्यावरण संतुलन असा तिहेरी हेतू या उपक्रमातून साध्य होणार आहे. यासाठी शासनाची मनरेगा योजनाही फार महत्त्वाची ठरली.

टॅग्स :शेतीचंद्रपूरफळेशेती क्षेत्र