हळूहळू थंडीचा कडाका कमी होऊन आता उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. मात्र सद्यस्थितीत नदी नाले कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. विहिरींनी देखील तळ गाठण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठं संकट येत्या दिवसांत जाणवणार आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांत आजच्या घडीला अवघा 49 टक्के पाणी साठा शिल्लक आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी टंचाईचे संकट आ वासून उभे राहिले आहे. पाण्याचे स्रोत देखील कमी होऊ लागले आहेत. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांतील पाणीसाठ्यात देखील घट होऊ लागली आहे. अशावेळी जिल्ह्याची मदार असलेल्या धरणातील पाणीसाठा देखील कमी होत आहे. अनेक धरणे तर कोरडीठाक होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला असता गंगापूर धरणांत 64 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणीसाठा चिंतेत भर टाकणारा आहे. कारण मागील वर्ष या सुमारास 79 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील धरणाचा विचार केला तर कश्यपी धरण 92 टक्के, गौतमी गोदावरी 62 टक्के, आळंदी 62 टक्के, पालखेड 30 टक्के, करंजवण 47 टक्के, ओझरखेड 44 टक्के, दारणा 48 टक्के, भावली 40 टक्के, वालदेवी 86 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 89 टक्के, चणकापूर 50 टक्के, हरणबारी 60 टक्के, गिरणा 30 टक्के, माणिकपुंज 23 टक्के असा एकूण केवळ 49 टक्के जलसाठा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध आहे.