महिलांची कृषी क्षेत्रातील (Agriculture) महत्त्वपूर्ण भूमिका तसेच योगदान लक्षात घेत ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय यांनी सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत कृषी सखी (Krishi Sakhi) एकत्रीकरण कार्यक्रम (केएससीपी) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कृषी सखीं उपक्रम नेमका काय आहे, ते पाहुयात..
1. कृषी सखी एकत्रीकरण कार्यक्रम (केएससीपी) नेमका कसा आहे?
‘लखपती दीदी’ या कार्यक्रमाअंतर्गत देशात 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते, ‘कृषी सखी’ हा त्याचाच एक भाग आहे. कृषी सखींचे निम-विस्तार कामगार म्हणून प्रशिक्षण तसेच प्रमाणीकरण करून ग्रामीण भागातील महिलांचे कृषी सखींच्या रुपात सक्षमीकरण करण्याच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा कायापालट घडवून आणणे हे कृषी सखी एकत्रीकरण कार्यक्रमाचे (केएससीपी) उद्दिष्ट आहे. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम “लखपती दीदी” कार्यक्रमाच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.
2. निम-विस्तार कार्यकर्त्या म्हणून कृषी सखींची निवड का केली जात आहे?
निम-विस्तार कार्यकर्त्या म्हणून https://www.lokmat.com/agriculture/कृषी सखींची (Krushi Sakhi) निवड केली जात आहे. कारण या महिला विश्वसनीय सामाजिक स्त्रोत व्यक्ती आहेत आणि त्या स्वतः अनुभवी शेतकरी आहेत. कृषी समुदायात खोलवर रुजलेली त्यांची पाळेमुळे या गोष्टीची खात्री करून देतात की त्यांचे समाजात स्वागत होईल आणि त्यांच्या शब्दाचा आदर केला जाईल.
3. कृषी सखींना कोणत्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे?
कृषी सखींना यापूर्वीच विविध विस्तारित सेवांवर आधारित 56 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात खालील घटकांचा समावेश करण्यात आला:
जमिनीची मशागत करण्यापासून पिकाच्या कापणीपर्यंत सर्व कृषी पर्यावरणीय पद्धती
शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतावर कार्यशाळा आयोजित करणे
बीयाणे बँका + स्थापना तसेच व्यवस्थापन
मृदा आरोग्य, मृदा आणि आर्द्रता संवर्धन प्रक्रिया
एकात्मिक शेती पद्धती
पशुधन व्यवस्थापनाची मुलभूत तत्वे
जैविक सामग्रीची तयारी तसेच वापर आणि जैविक सामग्री दुकानांची स्थापना
मूलभूत संवाद कौशल्ये
आता या कृषी सखींना एमएएनएजीईच्या समन्वयासह डीएवाय-एनआरएलएम संस्थांच्या माध्यमातून नैसर्गिक शेती तसेच मृदा आरोग्य कार्ड यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
4. प्रशिक्षणानंतर या कृषी सखींना कोणत्या प्रकारचे रोजगार पर्याय उपलब्ध होतील?
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कृषी सखींना एक प्राविण्य चाचणी परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांना निम-विस्तार कार्यकर्त्या म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे या सखींना केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खाली उल्लेख केलेल्या योजनांमध्ये निश्चित मानधन शुल्कासह रोजगार मिळवणे शक्य होईल. यातून अनेक कृषी सखी महिलेला एका वर्षात सरासरी 60,000 ते 80,000 रुपयांचे उत्पन्न मिळवता येईल.
5. आतापर्यंत किती कृषी सखींना प्रमाणित करण्यात आले आहे?
आजच्या तारखेला 70,000 कृषी सखींपैकी 34,000 कृषी सखींना निम-विस्तार कार्यकर्त्या म्हणून प्रमाणित करण्यात आली आहेत.
6. सध्या, देशातील कोणत्या राज्यांमध्ये कृषी सखी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे?
पहिल्या टप्प्यात देशातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, झारखंड ,उत्तर प्रदेश, ओदिशा आणि मेघालय या 12 राज्यांमध्ये कृषी सखी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
7. एमओव्हीसीडीएनईआर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत करून कृषी सखींना कशा प्रकारे उपजीविका मिळवता येते?
सद्य स्थितीत एमओव्हीसीडीएनईआर (ईशान्य प्रदेशासाठीचे सेंद्रिय मूल्य साखळी विकास अभियान) योजनेअंतर्गत 30 कृषी सखी स्थानिक संसाधन व्यक्ती (एलआरपी) म्हणून कार्यरत असून या महिला कृषीविषयक घडामोडींचे निरीक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसमोर असलेली आव्हाने समजून घेण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला दर महिन्यातून एकदा भेट देतात. शेतकऱ्यांनाविविध बाबींचे प्रशिक्षण देणे, त्यांच्याशी संवाद साधणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे, एफपीओ संस्थांचे कार्य तसेच विपणन व्यवहार समजून घेणे या उद्देशाने या सखी प्रत्येक आठवड्याला शेतकरी स्वारस्य गट (एफआयजी) पातळीवरील बैठका घेतात आणि शेतकऱ्यांची नोंदवही अद्ययावत करतात. उपरोल्लेखित सर्व कार्यांसाठी या कृषी सखींना दर महिन्याला 4500 रुपयांचे मानधन देण्यात येते.