नाशिक : जिल्हास्तरीय कृषी प्रर्दशनात तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. शेतकऱ्यांना लुटणारी मधली साखळी तोडून थेट शेतकरी अन् कंपनी यांच्यातील व्यवहार वाढण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. यासाठी शेतकरी अन् कृषी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची समोरासमोर चर्चा घडवून आणण्यात आली. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विकण्यासाठी आर्थिक अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन चर्चेत नोडल अधिकारी जितेंद्र शाह यांनी केले. सोबतच उपक्रमातून शेतकऱ्यांना कष्टाने पिकविलेला माल स्वतःचा कसा विकाल याच्याही टिप्स देण्यात आल्या.
कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तीन चर्चासत्रे व व्याख्यान झाले. खरेदीदार-विक्रेतादार संमेलनात विक्रेत्यांमध्ये भरत मुलाने, महेंद्र सुरवाडे, सुभाष जाधव, भाग्यश्री टेमकर, प्राजक्ता तांबोळी, हेमलता जाधव, प्रतिभा लव्हाटे, संजय गायकवाड, करण देशमुख, इकबाल शेख, नजीम सय्यद यांनी चर्चेत भाग घेतला. मुख्य मार्गदर्शक अविनाश भावसार यांनी ग्रेडिंग व पॅकिंग मटेरिअल कशा पद्धतीने असले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
कृषी स्टार्टअप - योजनेबाबत माहिती
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, व्यवस्थापन व बळकटीकरण याविषयावर स्टार्टअप फेडरेशनचे संचालक भूषण निकम यांनी कृषी स्टार्टअप योजनेचे महत्त्व सांगितले. लाभाथ्यांमध्ये शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप इत्यादींचा समावेश आहे. या योजनेंतर्गत मध्यम-दीर्घकालीन कर्ज मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांना करून देण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग' यावर तंत्र अधिकारी विश्वाव बर्वे यांनी संवाद साधला. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी योजना सुरू केल्याची माहिती बर्वे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रदर्शन; आज समारोपनाशिक कृषी महोत्सवात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. रोज कृषी विषयक, कृषी व्यवसाय, कृषी पर्यटन आदी विषयांवर चर्चासत्र होत असून खाद्य महोत्सव, कृषी प्रदर्शन आदी कार्यक्रम रोज होत आहे. आज महोत्सवाचा समारोप होत आहे. दिवसभर विविध चर्चासत्र व बक्षीस वितरण समारंभ पार पडेल.