चंद्रपूर जिल्हा निसर्गाच्या समृद्धीने व्यापलेला असून, जंगलाचे प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागूनच बफर झोन क्षेत्र आहे. बफर झोन क्षेत्रात जंगलाशेजारी गावे वसलेली असून, याच जंगलात कुडा नावाची वनस्पती भरपूर असून, जंगलाशेजारी गावातील नागरिक भाजी बनवण्याकरिता कुड्याची फुले आणून भाजी बनवीत असतात.
जंगलात हिरडा, बेहडा, आवळा या फळवर्गीय वनस्पतीसह कुडा नावाची वनस्पती ही मोठ्या प्रमाणात आढळते. कुडा वनस्पतीचा आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून वापर होतो. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कुड्याच्या फुलांची भाजी तयार करून खातात. उन्हाळ्याची चाहूल लागताच कुड्याच्या झाडांना फुले येण्यास सुरुवात होते.
पाच फुटापासून २० फुटापर्यंत आढळणारे कुड्याचे झाड जंगलात कानाकोपऱ्यात आढळते. विशेषतः झुडपी जंगलामध्ये कुड्याची झाडे सर्वांत जास्त आढळून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांची भाजी म्हणून सर्वांत जास्त वापर उन्हाळ्यात नागरिक करतात. फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाची फुले असलेले गुच्छ येतात. पोळ्याच्या सणादरम्यान कुड्याच्या झाडांना शेंगा येतात. याची भाजी खास बैलांना शेतकरी कुड्याच्या पानांच्या पत्रावळीतच खाऊ घालतात. त्यामुळे पोल्ल्याच्या सणाला कुड्याच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जेवणातही भाजी म्हणून वापर
करड्या रंगाच्या सालीचे झाड असते. कुड्याच्या बियांची चव कडू व तुरट असते. औषधी म्हणून मुळाची साल व बियांचा सर्वाधिक वापर होतो. शास्त्रातही कुड्याला महत्त्व आहे. पांढऱ्या फुलांमध्ये एक कडू द्रव्य असते. एप्रिल महिन्यामध्ये जिकडे तिकडे कुड्याची आडे फुलांनी बहरलेली असतात. कुड्याचे फुल, मूळ, बोड. पान, फळ आणि बिया बहुउपयोगी असतात. जंगलामध्ये कुड्याच्या फुलांचा सुगंध दळवळत असून, बाजारातही तो विक्रीला येत आहे. आवडीने लोक कुड्याची फुले विकत घेतात व भाजी बनवितात.