Join us

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक, नवीन अर्ज थांबवले, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 4:15 PM

Ladki Bahin Yojana : आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) महत्वाची अपडेट समोर आली आहे. ही योजना पुढील काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. 

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. यानुसार राज्यातील २ कोटीहून अधिक पात्र महिलांना साडे सात हजार रुपये मिळाले आहेत. या योजनेचे अर्ज करण्यासाठी दि. १५ ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे अर्जांची छाननी करण्यासह सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे नवीन अर्ज प्रक्रिया, अर्जातील सुधारणा या सर्व प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. 

या योजेनच्या अर्जासाठी वेब पोर्टल आणि नारीशक्त्ती अँपची (Narishakti App) मदत घेतली जात होती. मात्र या दोन्हीही सुविधा सध्या बंद आहेत. ज्या महिलांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत, ते अर्ज छानणीसाठी थांबविण्यात आले आहेत. तसेच नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. शिवाय काही अर्जात सुधारणा करून री सबमिट करावयाचे होते, मात्र ते देखील होत नसल्याचे सीएससी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटी असलेल्या अर्जांच्या पडताळणी प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. 

या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील महिला लाभार्थींच्या खात्यात २३ नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. सोबतच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तसेच काही महिलांचे आधारकार्ड बँकेला संलग्न नसल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे त्यांचे सिडिंग झाल्यानंतर बँक प्रक्रियेतील अनुदान त्या लाभार्थीना प्राप्त होईल; परंतु आता निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. 

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचाशेती क्षेत्रविधानसभा