Join us

Crop Management : पीक उत्पादनात जमीन आणि पाणी घटकांना महत्व, कारण... वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 8:35 PM

यासाठी कष्टासोबतच शेतीसाठी जमीन आणि पाणी महत्वाची भूमिका बजावत असतात. 

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. येणाऱ्या खरीप हंगामात विविध पिकांची लागवड करण्यावर शेतकरी भर देणार आहेत. पीक उत्पादनात जमीन आणि पाणी या दोन घटकांना अतिशय महत्व आहे. पीक हे जमिनीत वाढत असल्याने पीक वाढीचे जमीन हे मूलभूत माध्यम आहे. यासाठी कष्टासोबतच शेतीसाठी जमीन आणि पाणी महत्वाची भूमिका बजावत असतात.            खरीप हंगामात विविध पिके बहरू लागतात. पिकांची मुळे जमिनीत विस्तार पावतात, जमिनीत खोलवर जावून घट्ट राहतात आणि झाडांना आधार देतात. तसेच जमिनीतील पाणी व त्यात विरघळलेली अन्नद्रव्ये शोषण करुन पिकास पुरवतात. त्यामुळे पीक जोमाने वाढते व त्यापासून अधिक उत्पादन मिळते. जमिनीत पाणी व अन्नद्रव्याबरोबर उपयुक्त व घातक अशा निरनिराळया प्रकारचे जिवाणू असतात. रायझोबियम, ॲझोस्पिरीलम या उपयुक्त जिवाणूबरोबरच फ़्युजेरियम, रायझोक्टोनिया यासारखे रोगास कारणीभूत होणारे जिवाणूदेखील जमिनीत असतात. 

याव्यतिरिक्त जमिनीत कुजणारे सेंद्रिय पदार्थ  व त्यांचे विघटन करु पाहणारे जिवाणू अशा प्रकारे जमिनीत अनेक घडामोडी सतत चालू असतात आणि केवळ यामुळेच जमिनीला एक प्रकारे जिवंतपणा येतो. या जिवंतपणामुळे पिकास लागणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध होवू शकतात. पाण्याचा विचार करायचा झाला तर वनस्पतीच्या किंवा पिकाच्या सर्व शारीरिक क्रिया पाण्यामुळे घडू शकतात. झाडावरच्या पेशीमध्ये ९५ टक्क्यापेक्षा जास्त पाणीच असते. याचाच अर्थ असा की, जमिनीत जर पाणी नसेल तर पिकांना जगणेच अशक्य होईल म्हणूनच पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जमिनीबरोबरच पाण्यालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे.

पाणी पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त                जमिनीत असलेले असंख्य मातीचे कण आपल्याभोवती तसेच दोन कणांच्या पोकळीत पाणी शोषून ठेवतात. यापैकी कणाभोवती असलेले पाणी अतिशय घट्ट पकडून ठेवले जाते आणि या पाण्याचा पीक वाढीसाठी उपयोग होत नाही, परंतु दोन कणांच्या पोकळीतील पाणी पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त होते. जमिनीत चिकणमातीचे प्रमाण जसे वाढेल तसे कणाभोवती साठवून ठेवलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते म्हणून अशा जमिनीत उपयुक्त पाणी कमी असण्याची शक्यता जास्त असते. अशा जमिनी पेर करण्यासाठी लवकर तयार होत नाहीत. उलट त्या जमिनीत चिकणमातीचे प्रमाण कमी असते. त्या जमिनी दिलेल्या पाण्यानंतर अथवा पडलेल्या पावसानंतर वहितीकरता लवकर तयार होतात. 

लेखक : डॉ . कल्याण देवळाणकर हे सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ आहेत.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रपाणीपीक व्यवस्थापन