नाशिक :गव्हाच्या शेतामध्ये (Wheat Farm) लपून बसलेल्या बिबट्याचा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने अचूक वेध घेत एनजीओच्या वन्यजीव रक्षकाने धाडसाने उडी घेत त्याला जेरबंद करून सुमारे चार तासांचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कसबे सुकेणे शिवारातील वडाळी रस्त्यावरील गट क्रमांक ७५५ मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात सोमवारी दुपारी तीन वाजेपासून बिबट्या दडून बसला होता, मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला रेस्क्यू (Leopard Rescue) करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरु होता. यात विशेष म्हणजे एका एनजीओचे वन्यजीव रक्षक शरद जाधव यांनी बिबटचावर ड्रोप घेऊन त्याची मान पकडून ठेवत जेरबंद केले.
शरद जाधव यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. प्रवीण मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या (Leopard Rescue By Drone Camera) माध्यमातून या बिबट्याचा माग घेत त्याचे अचूक लोकेशन मिळाल्यानंतर निफाड वन विभाग, तसेच कसबे सुकेणे आणि ओझर पोलिसांनी सकाळी साडेनऊ वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातून बिबट्या निसटला, तिसऱ्या प्रयत्नात शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्याची मान पकडली.
बिबट्याला नेले निफाडला
वन विभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले व त्यास सुरक्षितपणे ताब्यात घेतले. निफाड येथील वनपाल भगवान जाधव, विजय दोंदे, विजय माळी, शरद चांदोरे, वैभव जाधव, राहुल गुंजाळ व पोलिस व स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता. वन विभागाने विशेष वाहनाने बिबट्याला निफाड येथे नेऊन त्याची तपासणी केली.
असा होता घटनाक्रम
- सकाळी ९ वाजता गव्हाच्या शेतात बिबट्याला पाहिले.
- सकाळी १० वाजता - प्रवीण मोगल यांनी तत्काल ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचे निरीक्षण सुरू केले व लोकेशन घेतले.
- सकाळी ११ वाजता - निफाड येथील वनपाल, बचाव पथक आणि कसबे सुकेणे व ओझर पोलीस रेस्क्यू व्हॅन शेतात दाखल.
- सकाळी ११:३० वाजता - रेस्क्यू ऑपरेशन सुरू, पहिल्या प्रयत्नात बिबट्या निसटला.
- सकाळी ११:५० - बिबट्याने केला हल्ल्याचा प्रयत्न,
- दुपारी १२:२० वाजता - वन्यजीव रक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेतली.
- दुपारी १२:२१ वाजता - वन विभागाच्या पथकाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले.
- दुपारी १२:३०: भुलीच्या इंजेक्शनमुळे बिबट्या बेशुद्ध झाला व पिंजऱ्यात बंद करण्यात आले.
आधुनिक साहित्य आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने बिबट्याचे लोकेशन समजले. बिबट्या सुरक्षित जेरबंद व्हावा याच उद्देशाने है रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
- शरद जाधव, वन्यजीव रक्षक, कसबे सुकेणे