Join us

Little Millat Harvesting : आदिवासी पट्ट्यात वरई सोंगणी कशी केली जाते? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 5:38 PM

Little Millat Harvesting : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) आदिवासी पट्ट्यात भात सोंगणीबरोबर, नागली, वरईची सोंगणी सुरु आहे.

Little Millat Harvesting : सध्या खरिपातील (Kharif Season) अनेक पिकांची काढणी जोरात सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात भात सोंगणीबरोबर, नागली, वरईची सोंगणी सुरु आहे. या तिन्ही पिकांच्या सोंगणी वेगवगेळ्या पद्धतीने केली जाते. वरईची सोंगणी हि विळ्याच्या साहाय्याने पिकाच्या मध्यापासूनच केली जाते. त्यानंतर खळ्यावर नेऊन मळणी केली जाते. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आदिवासी तालुक्यांसह नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत (Satpuda Moutain) रांगातील आदिवासी पारंपरिक पीक म्हणून वरईची शेती करतात. या पिकाची लागवड प्रमुख्याने जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभाग, उप-पर्वतीय विभाग व कोकण विभाग या कृषी हवामान विभागातील डोंगराळ भागात केली जाते. वरई हे महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांपैकी महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. या भागातील आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे प्रमुख पौष्टिक तृणधान्य पीक आहे.  

हे गवतवर्गीय कुळातील पीक असून भात, नागली प्रमाणेच पावसाळ्यात लागवड केली जाते. साधारणपणे १०० ते १२० दिवसांत पीक काढणीला येते. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून घेतली जातात. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी केली जाते. त्यानंतर धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवले जाते. वरई पिकाच्या देखील वेगवगेळ्या जाती असल्याने पक्वता कालावधी वेगळा असू शकतो. 

वरई शेतीचे प्रमाण कमी 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwer) आदिवासी भागात पूर्वी वरईची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असे. मात्र अलीकडच्या वर्षात हे प्रमाण घटले आहे. केवळ घरी खाण्यापुरती वरई शेती केली जाते. त्यातच इतर आर्थिक उत्पन्न देणारी पिके आल्याने किंवा पारंपरिक पिकातून उदरनिर्वाह होत नसल्याने हि शेती कमी होत गेल्याचे एका वरई कापत असलेल्या शेतकऱ्याने सांगितले. 

हेही वाचा : Ragi Crop : पांढरी नागली पीक आलंय जोमदार, काढणीला वेग, वाचा सविस्तर