नाशिक : भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केले होते. म्हणूनच त्या निमित्ताने मिलेट्सचे आपल्या आहारातील महत्व वाढावे, या हेतूने ५६२५ चौरस फुटांची "भरडधान्याची महारांगोळी साकारण्यात आली आहे. दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदा देशभरात आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष साजरे करण्यात आले. या निमित्ताने तृणधान्याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने वेगवगेळ्या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील गोदा घाटावर भरड धान्याच्या माध्यमातून स्थानिक तृणधान्याचे महत्त्व अधोरेखित करणारी ७५ बाय ७५ फूट म्हणजेच ५६२५ चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. यात नाचणी, वरई , मूग, कदरा ज्वारी, राळा आदी भरडधान्याचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच यंदा तृणधान्य आणि भरडधान्याचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. यात अकोला ,पुणे, नगर, जव्हार आणि नंदुरबार येथील लोकांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान या रांगोळीत वापरलेले गेलेले भरडधान्य हे पुढे निवडून, स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजू लोकांपर्यंत, अनाथ, वृध्दाश्रम इथे याचे वाटप केले जाणार आहे, तसेच त्याची खिचडी बनवून वाटप करण्यात येणार आहे.
कोणकोणतं भरडधान्य वापरलं?
या महारांगोळीसाठी तब्बल १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मुग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण ३००० किलो इतक्या भरडधान्यचा वापर करण्यात आला. १०० महिलांनी अवघ्या चार तासांत हि महारांगोळी साकारली.