Join us

Agriculture News : श्रेणी मूल्यांकनात राज्यातील कृषी विद्यापीठांची घसरण, मत्स्य विद्यापीठ झळकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:41 PM

Agriculture News : मुंबईचे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मत्स्य विद्यापीठ मूल्यांकन श्रेणीत ९ व्या क्रमाकांवर झळकले आहे. 

 - राजरत्न शिरसाठ 

अकोला : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क अंतर्गत करण्यात आलेल्या देशातील कृषी विद्यापीठ, संस्थांच्या मूल्यांकन श्रेणीत रैंकिंग राज्यातील चार कृषी विद्यापीठासह, नागपूर येथील महाराष्ट्र पशु, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा पहिल्या ४० मध्ये समावेश नसल्याने ही विद्यापीठे मूल्यांकन श्रेणीत माघारल्याचे दिसून येत आहे. मुंबईचे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मत्स्य विद्यापीठ मूल्यांकन श्रेणीत ९ व्या क्रमाकांवर झळकले आहे. 

राज्यात अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचे स्व. वसंतराव नाईक मराठवाडा, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (जि. अहमदनगर), दापोलीचे डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ रत्नागिरी आणि महाराष्ट्र पशू, मत्स्य व विज्ञान विद्यापीठ (नागपूर) यात केंद्रांतर्गत मुंबईचे केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मत्स्य विद्यापीठचा समावेश आहे. मुंबईचे मत्स्य शिक्षण, विद्यापीठ वगळले तर राज्यातील उर्वरित पाच विद्यापीठांचा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १३ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे जाहीर केलेल्या देशातील सर्वोच्च संस्थांच्या रँकिंगमध्ये ४०च्या आत समावेश नसल्याचे दिसून येत आहे.

देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कायदा, नवोपक्रम, संशोधन संस्था, वैद्यकीय, दंत, आर्किटेक्चर आणि नियोजन, कृषी आणि संलग्न क्षेत्रांनी श्रेणी जाहीर केली आहे. यावर्षी मुक्त विद्यापीठ, कौशल्य विद्यापीठ आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठ या तीन नवीन श्रेणींचादेखील समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठाचे स्वतंत्र रँकिंगराज्यातील कृषी विद्यापीठाचे रैंकिंग केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून (आयसीएआर) केले जाते असे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी आयसीआरची चमू प्रत्यक्ष कृषी विद्यापीठांना भेटी देऊन शिक्षण, संशोधन व विस्तार यासंदर्भात माहिती घेऊन रैंकिंग ठरवत असते, असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीविद्यापीठकृषी योजना