- युवराज गोमासे भंडारा : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) मोहाडी तालुक्यातील पांजरा (बोरी) येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र भाष्कर गाढवे या ध्येयवेड्या तरुणाने यंदा तीन एकरात मका पिकाची लागवड (Maka Pik Lagvad) केली आहे. मोहाडी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कीड व रोगाच्या नियंत्रणामुळे पीक जोमदार आले असून, एकरी १.२० लाखांचे उत्पादन होण्याची अपेक्षा रींद्र गाढवे यांनी व्यक्त केली आहे.
पारंपरिक धानाचे उत्पादन (Paddy Farming) परवडणारे नाही. त्यातच १४ महिन्यांच्या ऊस पिकाचे चुकारे वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे हतबलता वाढून पालोरा, जांभोरा, पांजरा क्षेत्रातील शेतकरी आता मका या तीन महिन्यांच्या अन्नधान्य पिकाकडे वळले आहेत. गतवर्षी थोडीफार झालेली सुरुवात आता २० हेक्टरपर्यंत पसरली आहे.
गतवर्षाच्या अनुभवाची शिदोरी यंदा नव्याने लागवड करत असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. नफा हमखास होत असल्याचे स्वानुभवातून शेतकरी सांगत सुटले आहेत. नगदी पिकाकडे केलेली केलेली वाटचाल अनेक शेतकऱ्यांना आर्थिक समुद्धीकडे नेणारी आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे आज तरी दिसून येते.
मका पिकासाठी मशागतीचे तंत्रप्रगतशील शेतकरी रवींद्र गाढवे यांनी रब्बीत मका पिकाची लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरने चार फेर शेतीची नांगरटी केली. सेंद्रिय खत, एक बॅग राखड़ी खत व युरियाचे मिश्रण टाकून दोनवेळा रेटावेटर फिरवून जमीन भुसभुशीत केली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी पाडल्या. मक्याचे 'पीएसी ७५१' हे संकरित वाण तुरीप्रमाणे प्रत्येकी एक दाणा याप्रमाणे महिला मजुरांच्या सहाय्याने सरींवर टिपले. अनुभव घेत अन्य शेतकऱ्यांनीही या नगदी पीक होणाऱ्या शेतीकडे वळणे काळाची बाब बनली आहे.
एकरी ६० क्विंटल उत्पादनदोन महिन्यांत मक्याचा दांडा ऊसाप्रमाणे भारीभरकस दिसत असून, एकरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सध्या बाजारात २२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. खर्च वजा जाता एकरी ५० हजारांचा नफा मिळण्याचा अंदाज शेतकरी रवींद्र गाढवे यांनी आजघडील अंदाज व्यक्त केला आहे.
उंचीनुसार खत-पाण्याचे व्यवस्थापन करापीक एक ते दीड फुटाचे असताना एकरी दोन बॅग डीएपी व युरियाचा डोस द्यावा. खतानंतर तातडीने पाण्याचे योग्य संतुलन राखावे. अळी व पिकातील तणांच्या निवारणासाठी दोनवेळा फवारणी करावी. पीक दोन ते तीन फुटांचे असताना पुन्हा दोनदा अळीनाशकाची फवारणी करावी. मेहनत व जिद्द बाळगल्यास कुठलीही बाब अशक्य नाही. गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची. नवनवीन बाबी अंगीकृत करून त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे गाढवे सांगतात.
पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीनजंगली जनावरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी पीक संरक्षणावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीच्या काटेरी कुंपणापेक्षा सौरऊर्जेवरील झटका मशीन अधिक फायदेशीर मानली जात आहे. झटका बसताच पाळीव व जंगली जनावरे पिकाकडे फिरकत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.