नाशिक :लासलगाव (Lasalgaon Maka Export) येथून जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पोल्ट्रीसाठी २६०० टन मका (४२ बॉक्स) रेल्वेने रवाना झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून यंदा प्रथमच लासलगाव येथून मक्याची रवानगी जम्मू काश्मीरला होत आहे. सर्वाधिक आवक झाल्याने पोल्ट्री (Poultry Food) खाद्यासाठी मका निर्यात होत आहे.
आगामी काही दिवसांत गुवाहाटीसाठी (Guwahati) दुसरी बॅच पाठवली जाणार आहे. लासलगाव येथून गुरुवारी सागर थोरात यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील पोल्ट्री इंडस्ट्री असलेल्या बारीब्राह्मण या शहराला मका पाठविण्यात आला. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे मक्याची आवक कमी होती. पण चालूवर्षी चांगल्या पावसामुळे मक्याची चांगली आवक झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ३८ हजार क्विंटल मक्याची विक्री झाली होती.
चालूवर्षी नोव्हेंबर अखेर ३५ हजार क्विंटल मक्याची विक्री झाली आहे. सरकारतर्फे मका आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी होते. मात्र, तीन वर्षांपासून मक्याची हमीभावाने खरेदी झालेली नाही. चालू हंगामात लासलगाव बाजार समितीत मक्याची सर्वात जास्त आवक होती. १३,७३२ हजार क्विंटल मक्याची आवक होऊन किमान भाव १८९९ रुपये, कमाल २३२५ रुपये तर सरासरी भाव २२५१ रुपये होता.
चार वर्षातील आवक
लासलगाव येथे चार वर्षातील आवक पाहिली असता २०२०-२१ मध्ये ०९ लाख ७५ हजार ५१५ क्विंटल, २०२१-२२ मध्ये ०७ लाख ५७ हजार ९७४ क्विंटल, २०२२-२३ मध्ये ६ लाख ८४ हजार ८०८ क्विंटल, तर २०२३-२४ मध्ये ०६ लाख ५१ हजार ३४० क्विंटल अशी निर्यात झाली आहे.
Agro Advisory : शेतकऱ्यांनो! अशी घ्या पिकांची काळजी; कृषी सल्ला वाचा सविस्तर