- भूषण सुके
नागपूर :नागपूर जिल्ह्यातील (Nagppur) चार तर शेजाऱ्याच्या अमरावती जिल्ह्यातील (Amravati) पाच तालुक्यांमधील संत्रा बागांवर (orange Farming) काळ्या व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही बागांमध्ये शेंडेमर व डिंक्या आढळून आला आहे. त्यामुळे बागांवर काेळशीचे प्रमाण वाढण्याची व बागा धाेक्यात येऊन नुकसानाची तीव्रता वाढण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या माशीचे वेळीच याेग्य व्यवस्थापन करावे, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.
विदर्भात नागपुरी संत्र्याचे लागवड क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. अलीकडे प्रतिकूल हवामानामुळे या शेंडेमर, डिंक्या तसेच काळ्या व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संत्रा बागांना धाेका निर्माण झाला आहे. मागील २० वर्षांत काेळशीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटाेल व नरखेड तसेच लगतच्या अमरावती जिल्ह्यातील वरूड व माेर्शी तालुक्यांतून संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटाेल, कळमेश्वर व सावनेर तसेच अमरावती जिल्ह्यातील वरूड, माेर्शी, परतवाडा, तिवसा व चांदूरबाजार या तालुक्यांमधील संत्रा बागांवर काळ्या व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे आवश्यक आहे, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
माशीची ओळख व जीवनक्रमकाळ्या व पांढऱ्या माशीमुळे बागा काेळशीला बळी पडतात. ही माशी १ ते १.२ मिमी लांब, पंख काळसर किंवा पांढरे व पाेटाचा भाग लाल असताे. या माशा नवतीच्या काळात पानांच्या खालच्या भागात अंडी घालतात. अंड्यांमुळे बाहेर पडणारी पिल्ले पानांमधील अन्नद्रव्य शाेषून घेतात. या माशीच्या वर्षभरात तीन पिढ्या पूर्ण हाेतात, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगितले.
व्यवस्थापन कसे करायचेया किडीच्या व्यवस्थापनासाठी किडींचे कोश आढळताच प्रथम डायमेथोएट २० मि. लि. किंवा ईमिडाक्लोप्रीड पाच मि. लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बुरशीचा नाश करण्यासाठी फवारणीमध्ये काॅपरऑक्सीक्लोराइड किंवा झायनेव २५ ग्रॅम या प्रमाणात मिसळावे. काळ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी मॅलाडा बोनिनेन्सीस या परभक्षक मित्रकिडीची अंडी हस्त बहाराचे वेळी दोनदा सोडावीत. निंबोळी अर्काची १५ दिवसांच्या अंतराने दाेनवेळा किंवा पहिली फवारणी निंबोळी तेल १०० मि. लि., दुसरी फवारणी फक्त निंबोळी तेल १२५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून सोबत १२ ते १५ ग्रॅम डिटर्जंट पावडर मिसळून फवारणी करावी किंवा मेओथ्रिन १० मि. लि. व २५ ग्रॅम काॅपरऑक्सीक्लोराइड १० लिटर पाण्यामध्ये मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दाेन फवारण्या कराव्या.
फवारणीचे नियाेजनजुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली आणि १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याात व १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात व १५ दिवसांनी तिसरी फवारणी करावी.
फवारणी करतेवेळी नवतीची कोवळी पाने चांगल्याप्रकारे फवारल्या जातील आणि उंच शेंड्याकडील भागावरसुद्धा फवारणी पोहोचेल, याची काळजी घ्यावी. फवारणी कमीत कमी दिवसात आटोपावी तसेच पानांवर पडलेले औषध खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रथम फवारणीनंतर दुसरी कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी दोन आठवड्यानंतर करावी.
- डाॅ. प्रदीप दवणे, कीटकशास्त्रज्ञ,कृषी महाविद्यालय, नागपूर