अनेक भागात हरभऱ्याच्या पिकाला फलधारणा झाली आहे. त्यातच चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्या अनुषंगाने कामगंध सापळ्यांचा वापर केला जात आहे. नैसर्गिक किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळ्यांचा उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
चालू रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र सद्यस्थितीत घाटेअळीच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे हरभऱ्याचा उत्पादन खर्च वाढणार असून, दुसरीकडे किमान ४० टक्के उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत खैरी (लखमा) शिवारातील हर्षा निंबाळकर यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याअनुषंगाने कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी खैरी (लखमा) यांसह इतर शिवारातील हरभऱ्याच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना घाटेअळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
अशी करा फवारणी
घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी सात ते १० दिवसांपूर्वी पिकावर निंबोळी अर्क किंवा अझाडीरेकटीनची फवारणी करावी. या अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजेच प्रति मीटर ओळींमध्ये दोन अळ्या आढळून आल्यास किंवा पीक ५० टक्के फलोत्पादन असताना एचएलपीव्ही 500 एलई हेक्टरी किंवा क्विनॉलफॉसची पहिली फवारणी करावी. पंधरा दिवसांनी इमामेक्टीन बेंझोइट किंवा इथियॉनची फवारणी करावी असा सल्ला तालुका कृषी अधिकारी राकेश पशु यांनी केले आहे.
कामगंध सापळ्यांचा वापर करा
परभक्षक पक्षी पिकामध्ये फिरून अळ्या खातात. यामुळे किडींचे नियंत्रण होते. अवाजवी कीटकनाशक फवारणी केल्यास वासामुळे ते येणार नाहीत. शेतात मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून वापर केला नसल्यास बांबूचे त्रिकोणी आकाराचे प्रती हेक्टर २० पक्षी थांबे तयार करून शेतामध्ये लावावेत. पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी सात ते दहा दिवसांपूर्वी हेक्टरी पाच कामगंध सापळे निरीक्षणासाठी लावावेत. सतत तीन दिवस आठ पतंग आढळून आले तर नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात. नंतर हेक्टरी २० कामगंध सापळे नियंत्रणासाठी लावावेत, असेही मिलिंद शेंडे यांनी सांगितले.