यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने चाऱ्याचा प्रश्न पशू पालकांसमोर उभा आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या स्वरूपाचा चारा शेतकरी तयार करत आहे. याच पार्श्वभूमीवर शेवग्याच्या माध्यमातून देखील चारा निर्मिती करता येणार आहे. एकीकडे शेवग्याच्या फुलांचा आणि शेंगांचा भाजीकरीता उपयोग करण्यात येतो. मात्र शेवग्याची पाने ही पशुधनासाठी उत्तम प्रकारचा चारा होऊ शकतो, ही लक्षात घेतले पाहिजे.
शेवगा या वनस्पतीची कोरडवाहू क्षेत्रातही लागवड करता येते. या वनस्पतीत टॅनिन, ट्रायपीसीन आणि अमायलेज या घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते. शेवग्याच्या ताज्या पानांचा विविध पशुधनाच्या आहारामध्ये समावेश करता येतो. पशुधनास शेवग्याची पाने खाऊ घातल्याने, मेढयांच्या वजनामध्ये वाढ, दुध उत्पादनात वाढ आणि शेळयांच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा आढळून आलेली आहे. शेवग्याची पाने वाळवून सुध्दा पशुधनास खाऊ घालता येऊ शकतात. हवामान व मातीची आवश्यकता शेवगा ही मुलतः ही समशीतोष्ण कटिबंधीय वनस्पती आहे. २५ ते ३५ सेंटिग्रेड तापमानात या वनस्पतीची चांगल्याप्रकारे वाढ होते. हलक्या प्रतीचो वालुकामिश्रीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन शेवगा वनस्पतीसाठी उत्तम असते. पाणी धरुन ठेवणा-या, काळ्या मातीच्या जमीनीत शेवगा या बनस्पतीची लागवड करण्यात येऊ नये, असे कृषि तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
पानांची कापणी कधी करावी?
शेवग्याच्या पानाची कापणी ही वनस्पतीची सर्वसाधारण उंची १.५ ते २ मीटर (लागवडीनंतर ६० ते ९० दिवस) झाल्यानंतर करण्यात यावी. कापणी करीत असताना, जमिनीपासून २० ते ४५ सें.मी. उंचीवर कापणी करावी. त्यामुळे नवीन अंकुर फुटण्यास वाव राहतो. त्यानंतरची कापणी प्रत्येकी ३५ ते ४० दिवसांनी घेण्यात यावी. चा-याकरीता शेवग्याच्या पानाची कापणी ही ७५ दिवसानंतर करण्यात यावी. शेवगा या वनस्पतीची आंतरपीक म्हणून लागवड केल्यास, २ ते ४ महिन्याच्या अंतराने कापणी करावी. अशावेळी कापणी करताना, दुस-या आंतरपीकावर शेवगा या वनस्पतीच्या सावलीचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असे तज्ञ सांगतात.
पशुधनाच्या चाऱ्यासाठी चांगला पर्याय
शेवगा ही वनस्पती पशुधनाच्या चाऱ्यासाठी ही चांगली पर्यायी वनस्पती असल्याचे दिसून येते. शेवगा या वनस्पतीची बियापासून व कलमापासून लागवड करता येते. शेवगा या वनस्पतीची तुलनात्मकदृष्ट्या पाण्याची व मुलद्रव्यांची गरज कमी असते. या वनस्पतीपासून चांगल्या प्रमाणात व उत्तम गुणवत्तेचा चारा उपलब्ध होतो. विशेषतः कमी पर्जन्यकाळात शेवगा या वनस्पतीपासून मिळणारा चारा पशुधनाची गरज भागवू शकतो. शेवगा या वनस्पतीची लागवड बांधावर आंतरपीक म्हणून करता येऊ शकते. यामुळे शेवगा ही वनस्पती पशुधनाच्या चाऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे.