Join us

तेल, कडधान्यांची आयात, मग कांदा, गहू, साखरेवर निर्यातबंदी का? शेतकरी संमेलनात तज्ज्ञांचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 7:44 PM

एकीकडे सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. मात्र ते पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार करायला तयार नाही.

नाशिक : जागतिकीकरणात शेतीक्षेत्राला पुढे जाण्यासाठी प्रचंड संधी आहेत. ‘इंडियाकडून भारताकडे जाण्यासाठी मोठा वाव आहे. मात्र हे बदलाचे वारे आमच्यापर्यंत पोहोचू दिले जात जात नाही. नियंत्रणाच्या मोठ्या भिंती निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे शेतीक्षेत्र अधोगतीकडे जात आहे व त्यासाठी सरकारची शेतीविरोधी धोरणे कारणीभूत आहेत. असा सूर  ‘भारताकडून इंडियाकडे..बदलाचे वारे‘ या परिसंवादात उमटला.

नाशिक येथील सह्याद्री फार्म्स येथे आयोजित 11 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी हा परिसंवाद झाला. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी नेत्या सीमा नरोडे, प्रा. नवनाथ ताकटे, रमेश खांडेभराड, गंगाधर मुटे यांनी यात सहभाग घेतला. यावेळी अनिल घनवट म्हणाले, जागतिक बाजारात टिकून राहायचे असेल तर खुल्या आभाळाखाली पारंपारिक पध्दतीने शेती करुन आता चालणार नाही. जगभरातील प्रगत राष्ट्रांत सिध्द झालेले तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीत वापरावे लागेल. धोरणकर्ते मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यांना शेतकरी गरीब, कर्जबाजारीच राहू द्यायचा आहे की काय अशी शंका येते. जीएम तंत्रज्ञान, इथॅनॉलची निर्मिती, बीटी तंत्रज्ञान ही तंत्रज्ञाने नव्या काळाची गरज आहे. मात्र त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे.

सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलायला हवं!

एकीकडे सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. मात्र ते पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार करायला तयार नाही. एकीकडे मोठ्याप्रमाणात तेल, कडधान्ये, यांची प्रचंड आयात होत असतांना आपल्या शेतकऱ्याकडील गहू, तांदूळ, तेलबिया, साखर, कांदा यावर मात्र निर्यातबंदी लादली जात आहे. सीमा नरोडे म्हणाल्या की, जो पर्यंत सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत भारताची इंडियाकडे वाटचाल होणार नाही. साहित्यिकांनी शेतकऱ्यांची ही कोंडी आपल्या साहित्यातून जोरकसपणे मांडली पाहिजे. 

मातीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज

गंगाधर मुटे म्हणाले की, सरकारच्या शेतीविरोधी धोरणांनी शेतकऱ्यांची मार्केटींग करण्याची क्षमताच संपवून टाकली आहे. त्यामुळे उत्पादनाच्या पलीकडे बाजारात शेतकरी हतबल झाला आहे. शरद जोशींनी भारत आणि इंडिया यांच्यातील दरी मिटविण्यासाठी चतुरंग शेतीची संकल्पना मांडली होती. आता या संकल्पनेची कास धरण्याची गरज आहे. नवनाथ ताकटे यांनी शेती किफायतशीर होण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज विशद केली.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनाशिकशेतकरीकेंद्र सरकार