प्रमोद आहेर
शिर्डी : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत असून बिबट्याचे हल्ले सर्वश्रुत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे येथील मे. पेस्टोसिस एल. एल. पी. या कंपनीने बिबट्यांपासून संरक्षणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये बिबट्यांना प्रतिकर्षित करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. यामुळे बिबट्यांसह इतर वन्य प्राणी घराभोवती किंवा शेतात फिरणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने तयार केलेल्या औषधाचा वापर केल्याने बिबट्यांसह इतर वन्य प्राण्यांना कोणताही धोका होत नाही. या औषधाच्या वासामुळे बिबट्यांना विशिष्ट प्रकारची संवेदना मिळून ते त्या भागातून दूर राहतात असे पेस्टोसिसचे संस्थापक अविनाश साळुंके यांनी सांगितले. हे एक बिनविषारी आणि वासावर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर माकड, डुक्कर, उंदीर, साप, पक्षी आणि रानटी पशू यांसारख्या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. या पद्धतीचा वापर आधीच रायगड, अमरावती, रत्नागिरी या जिल्ह्यांसह हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये डुक्कर, माकड अशा वन्यजीवांसाठी करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातही वन्यजीवांचा उपद्रव कमी करण्यासाठी पेस्टोसिसला हा पथदर्शी प्रयोग करण्यासाठी शासनाने अनुमती दिली आहे. या पद्धतीचा वापर करून वन्यजीवांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वन्यजीव विभाग आणि नागरिकांच्या मदतीने कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. या नवीन पद्धतीमुळे वन्य प्राण्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल आणि मानव-प्राणी संघर्ष कमी होईल, असा विश्वास साळुंके यांनी व्यक्त केला.
वन्य प्राणी जवळ येत नाही...
या औषधामुळे वन्य प्राणी घरे आणि शेताच्या परिसरापासून दूर राहतात. निर्जन व जंगलातून जाताना एखाद्या व्यक्तीने या औषधाचा आपल्या कपड्यांवर अत्तरासारखा वापर केला तर वन्य प्राणी त्याच्याजवळ येत नाहीत, असा दावा अविनाश साळुंके यांनी केला आहे.
भूमिपुत्राचे तंत्रज्ञान आले कामी
कंपनीचे मालक अविनाश साळुंके हे राहाता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी आहेत. त्यांची कंपनी पुणे येथे आहे. राज्यात इतर वन्यप्राण्यांबाबत या औषधांचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. राहाता तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत बिबट्यांनी दोन बालकांचे बळी घेतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाने पुढाकार घेऊन बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. अशावेळी साळुंके यांनी या औषधांचा प्रयोग करण्याची वनविभागाकडे सूचना केली.
वनविभागाने दिली परवानगी
पेस्टोसिस कंपनीला उपवनसंरक्षक, अहमदनगर यांनी या औषधाचा वापर जिल्ह्यात करण्याबाबत मान्यता दिली आहे. औषधांचा वापर करण्यापूर्वी त्याची कंपनीने आधी वनविभागाला सूचना द्यायची आहे. प्रात्याक्षिकादरम्यान वन्यप्राण्याला कोणतीही क्षती होणार नाही, अशी काळजी कंपनीने घ्यायची आहे. तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदींचा भंग होणार नाही. याची काळजी घ्यायची आहे..