गोंदिया : नाेकरी मिळावी म्हणून अनेकजण उच्च शिक्षण घेतात. मात्र शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही, अशावेळी त्यांना नैराश्य येते. आलेले नैराश्य झटकून जिद्दीने स्वतःचा व्यवसाय करणारा यशस्वी होतो. याचीच अनेक उदाहरणे आहेत. गावातच राहून पारंपरिक दूध विक्री व्यवसाय व अनोखा भाजीपाला व्यवसाय (Vegetable Business) करून काही युवा आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात (Gondiya District) उद्योग धंद्यांचा अभाव आहे. त्यामुळे रोजगारासाठी बाहेरगावी युवा स्थलांतर करतो. काही युवा कंपन्यांमध्ये काम करतात. परंतु तेथेसुद्धा त्यांना स्थैर्य मिळत नाही. कंपनीत काम केल्यानंतर घरी परतलेले अनेक युवा आहेत व ते जुन्याच व्यवसायात पुन्हा लागले. परंतु काही युवा असेही आहेत की, जे सुरुवातीपासूनच आपल्या व्यवसायात प्रगती करीत आहेत. शिक्षणासह पारंपरिक व्यवसाय करून त्यांनी कुटुंबास आर्थिक हातभार तर लावलाच, शिवाय बरीच प्रगती सुद्धा केली. व्यवसायाबाबत कुठलीही कमीपणाची भावना काहींमध्ये दिसत नाही. आता नोकरीसाठी दारोदारी भटकण्यापेक्षा शेती अन् शेतीला पर्यायी उद्योग म्हणून दुग्ध व्यवसायाकडे (milk Business) तरुण वर्ग वळू लागला आहे.
आजोबांच्या व्यवसायाला नातूही वाढविणार
घरात २५ एकर शेती. त्या शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन घेतले जाते. आजोबांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला मुलानेही केले. आता नातूही उच्च शिक्षण घेऊन दुधाचा धंदा वाढविण्याचा चंग आमगाव तालुक्याच्या ग्राम करंजी येथील पिंकेश लांजेवार या तरुणाने घेतला आहे.
शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध उत्पादनावर भर देत शेती हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय. वडिलोपार्जित शेतीवर धानाची लागवड करून शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत आहोत. वर्षाकाठी दोन पिके शेतीतून घेतो. त्यामुळे आणखी आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतकऱ्याला दुधाचा व्यवसाय हा पूरक असल्याने हा व्यवसाय ग्राम किडंगीपार येथील समर भांडारकर करीत आहेत.
कष्टाशिवाय फळ नाही
शेतकरी वर्ग शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध उत्पादन घेतो. परंतु या दुग्ध उत्पादनातून ते थोडीशी मिळकत मिळवितात. दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन उद्योगाच्या स्वरूपात करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या शिक्षणाचा फायदा दुग्ध उत्पादनाला व्हावा हीच माझी आवड आहे.
- पिंकेश लांजेवार, तरुण करंजी