नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Scheme) व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त अनुसूचित जाती (scheduled caste) व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे (Samaj Kalyan Vibhag) सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येतो. योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. अध्यक्ष, सचिव व 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रूपये 3 लाख 50 हजार इतकी आहे.
स्वयंसहायता बचत गटांनी या कमाल मर्यादा रकमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय असते. अनुज्ञेय रक्कम 3 लाख 50 हजारापेक्षा अधिकची रक्कम संबंधित बचत गटाला स्वत: खर्च करावी लागेल. स्वयंसहाय्यता बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व हे बँक खाते बचतगटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असावे.
शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील
स्वयंसहाय्यता बचत गटांचे उत्पन्न वाढावे, या हेतुने मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याला या साधनांची विक्री अथवा सावकार व अन्य व्यक्तींकडे गहाण ठेवता येणार नाही. योजनेच्या अधिक माहिती तसेच इतर अटी व शर्तींच्याअधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पूलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.