Agriculture News : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी आज महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा (Nandurbar District) दौरा केला. या एक दिवसाच्या भेटीत त्यांनी नंदुरबार येथे कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषक मंडपम, शेतकरी ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांनी केले.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, रासायनिक खते आणि इतर रसायने यांच्या वापरामुळे केवळ माणसांचे आरोग्यच बिघडत नाही तर पृथ्वीचे आरोग्यही बिघडत आहे. गरज असो अथवा नसो, आपण रसायनांचा खूप सढळपणे वापर करत आहोत आणि त्याच उत्पादनांचे सेवन आपण करीत असल्यामुळे माणसांचे आरोग्य बिघडत आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, या कारणांमुळेच नैसर्गिक शेतीला (Organic Farming) प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याकडे 5 एकर जमीन असेल तर त्याने संपूर्ण जमिनीवर शक्य नाही, तरीही आपल्या शेतीपैकी काही भागामध्ये नैसर्गिक शेती करावी. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती मदत देत आहे. कृषी मंत्री म्हणाले की, तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील काही गावे निवडा आणि तिथे रासायनिक खते आणि कीटकनाशकांशिवाय शेती करण्याचा प्रयोग सुरू करावा. शिवराज सिंह म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्र नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण देखील देईल तसेच इतर आवश्यक असणारी व्यवस्थाही करेल.
पाण्याचा योग्य वापर करा नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारणासाठी आवश्यक असणारी काही कामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले. उपलब्ध पाण्याचा अधिक चांगला वापर करणे ही आजच्या काळात आवश्यक गोष्ट बनली आहे. येथे विविध ठिकाणांहून पाणी वळवण्याचे प्रयत्न झाले आहेत, परंतु पाणी शेतांपर्यंत पोहोचत नाही. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा फायदा घेत कमी पाणीही तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचवता येते असे ते म्हणाले.
पावसाचे पाणी साठवा... शिवराज सिंह यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही प्रकल्प तयार करा, भारत सरकार कृषी विकास योजनेअंतर्गत देखील मदत करेल. जर संपूर्ण जिल्ह्यात शक्य नसेल तर काही क्षेत्र चिन्हांकित करण्यात येवून प्रकल्प राबविण्यात यावा. यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारही एकत्रितपणे काम करतील. दुसरे काम म्हणजे, भूजल कसे राखता येईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, पावसाचे पाणी साठवले पाहिजे. आकाशातून पडणारे पाणी आपण वाया जाऊ देवू नये. ते पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.