गडचिरोली : जानेवारी महिन्याला सुरुवात होताच जिल्ह्यातील हजारो मजूर मिरची तोडण्यासाठी (Chilly Harvesting) तेलंगणा राज्याची वाट धरतात. या भागातून जवळपास २५ हजार मजूर मिरची तोडण्यासाठी (Mirchi Todni) तेलंगणात जात असतात. त्यामुळे या ठिकाणी मजुरांची गर्दी वाढली आहे. मात्र बारा तास काम करावे लागत असून मजुरी केवळ ५०० रुपये मिळत असल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर महिन्यात धानाची कापणी (Paddy Harvesting) आटोपल्यानंतर येथील मजुरांना तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जाण्याचे वेध लागते. कमी कामात जास्त मजुरी मिळते, असा भ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या दरवर्षी वाढतच चालली आहे. यावर्षी तर कहरच झाला. हजारो मजूर तेलंगणात (Telangana) गेले असल्याने तिथे काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेकडो मजूर गेल्यापावली परत येत आहेत. ये-जा करण्याचा खर्च या मजुरांना सहन करावा लागला आहे.
१२ तासांच्या कामाची ५०० रुपये मजुरी
सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तास काम केल्यानंतर ५०० रुपये मजुरी मिळते. आठवड्यातून एकही दिवस सुटी न घेता तिथे काम करावे लागते. २ तेलंगणात १२ तास काम करणारा मजूर गावात मात्र पाच तासांपेक्षा जास्त वेळ काम करत नाही. तर त्याला गावात जास्त मजुरी कशी मिळणार, असा प्रश्न आहे.
कमी दराने कामाची मजबुरी
पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतून मोठ्या प्रमाणात मजूर मिरची तोडण्यासाठी जात असल्याने आता मिरची तोडण्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसाधारणपणे मिरची तोडणीचा दर १० रुपये प्रतिकिलो असा आहे. मात्र, उशिरा गेलेल्या मजुरांना ६ ते ७ रुपये प्रतिकिलो दराने मिरची तोडायला लावली जात आहे. तेवढ्या दूर गेल्यावर किमान ये-जा करण्याचा खर्च निघावा, म्हणून काही मजूर काम करत आहेत.