Join us

तुमचं रेशन दुसऱ्याने घेतलं तर? म्हणून रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक करा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 2:05 PM

ग्रामीण भागासह शहरी भागात मिळत असलेल्या रेशनसाठी देखील मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे.

आजकाल दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात मिळत असलेल्या रेशनसाठी देखील मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे. त्याशिवाय दर महिन्याला मिळणारे धान्य मिळण्यास अडचण येईल. त्यामुळे अनेक शिधा पत्रिका धारकाचे मोबाईल नंबर रेशनकार्डला लिंक करण्यात आले आहेत. अशावेळी गैर व्यवहाराला आळा बसण्यास मदत होते आहे. 

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना रास्त भावात धान्याचे वितरण केले जाते. पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण केले जात असले तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपीचा वापर करून धान्याची उचल लाभार्थ्याला करता येते; परंतु संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे. स्वस्त धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे धान्य दुकानदारांकडे ग्राहकांकडून अनेक तक्रारीसुद्धा प्राप्त होतात. अशा प्रकारांवर आळा बसावा, स्वस्त धान्याचे वितरण सुरळीत व निकोप पद्धतीने व्हावे, यासाठी पॉस मशिनवर धान्याचे वितरण केले जात आहे. 

नाशिक जिल्ह्यात १३ लाख ३१ हजार १५ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांपैकी 08  लाख 34 हजार 481 कार्डधारकांनी शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक सीडिंग केलेला आहे. सदर ग्राहकांना ओटीपीचा वापर केल्यास संदेश येतो. म्हणजेच या ग्राहकाच्या नावावर एखाद्या व्यक्तीने रेशन घेतल्यास त्याक्षणी संबंधित ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर मॅसेज पाठवला जातो. अशावेळी संबंधित रेशन कार्ड धारकाने तात्काळ यासाठी शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणी, मोबाइल क्रमांक जोडणी, आदी प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली. आपल्या जागी दुसन्यानेच रेशन घेतल्यास मोबाइलवर मेसेज येतो.

धान्य घेतले की येणार एसएमएस

एखाद्या कार्डधारकाने स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी मोबाइल ओटीपी सेवेचा लाभ घेतल्यास त्याच्या मोबाइलवर धान्य घेतल्याचा संदेश प्राप्त होतो. येथील , अन्न पुरवठा निरीक्षक दीपक नागरगोजे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जात आहे. शिधापत्रिकाधारकांनी मोबाइल क्रमांक संलग्न करावा. 

मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी काय कराल?

शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क साधावा. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून मोबाइल क्रमांक जोडणीसाठी अर्ज करावा. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीशेतकरीभातलागवड, मशागतशेती क्षेत्र