चंद्रपूर : वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी गाव एकत्र आले तर कसा चमत्कार घडतो, हे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मुंडाळा येथील नागरिक व ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखविले आहे. वनहक्क क्षेत्रातील १२ हेक्टर परिसरात तब्बल ११ हजार फळझाडे (fruit Crops) लावून संगोपन केल्याने ही फळझाडे नागरिकांसाठी लक्षवेधी ठरली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojna) व आय.सी.आय.सी.आय. यांच्या अभिसरणातून ग्रामपंचायत मुंडाळा येथे २०२२-२३ मध्ये सामूहिक वनहक्क दावा मंजूर झाला. प्राप्त एकूण क्षेत्रापैकी १२ हेक्टर क्षेत्रावर ११ हजार फळझाडे लागवडीचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणीही झाली. या सीएफआर क्षेत्रावर या वर्षातही वृक्षलागवडीची तयारी झाली. सरपंच व ग्रामरोजगार सेवकांना कसरगाव, गेवरा बुज, गायडोंगरी, मंगरमेंढा, पालेबारसा, चिखली, डोंगरगाव ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश दिला. मुंडाळा ग्रामपंचायतीसारखीच फळबाग फुलवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन यांनी केले.
सीताफळ अन् करवंदाची बागमुंडाळ्यातील १२ हेक्टर क्षेत्रात सीताफळाची ५ हजार ५००, करवंदाची ४ हजार ८५० व आंब्याची ६५० फळ झाडे उत्तम पद्धतीने वाढली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विशेष लक्ष घातल्याने हे फळबाग आता चांगलेच बहरत आहे. वनहक्क अंतर्गत मिळालेल्या वनक्षेत्राचा योग्य वापर करण्यात आला. त्यामुळे मुंडाळा हे फळझाडांचे गाव म्हणून प्रसिद्धीस येणार आहे.
मनरेगा ही ग्रामविकास करण्याची सक्षम योजना आहे. मुंडाळा ग्रामपंचायतीने फळझाडे लागवडीत जिल्ह्यातून आघाडी घेतली. अन्य ग्रामपंचायतींनी तेथील कामांपासून प्रेरणा घेऊन अशीच फळबाग फुलवावी. मिशन बांबू लागवडीतही उत्तम काम करावे.- विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., चंद्रपूर