Nafed Onion Issue : नाफेडच्या कांदा खरेदीत (Onion Issue) चौफेर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यात नाफेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुळात सरकारला योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच करायच्या आहेत का? याच उत्तम उदाहरण म्हणजे एवढं मोठे गोडाऊन असूनही कांदा दिसून येत नाही. या नाफेड खरेदीची मुळापासून चौकशी झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत प्रहार संघटेनचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले.
आज नाशिकच्या (Nashik Onion Issue) कांदा पट्ट्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर नाफेडच्या गोडावूनला भेट दिल्यानंतर नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळाप्रश्नी बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरले. काही दिवसांपूर्वी लोकमत ऍग्रो माध्यमातून नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळ्याची पाळेमुळे शेतकऱ्यांसमोर आणली. यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी सरकारला याबाबत जाब विचारला. याच पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू लासलगाव येथे नाफेडच्या कांदा गोडावून ला भेट देत सरकारवर प्रहार केला. आता याबाबत 25 सप्टेंबरला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.
ते म्हणाले की, नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यात नाफेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत शेतकऱ्यांचे जबाब आहेत, यादी आहे, याची तपासणी केली पाहिजे. शेतकऱ्यांनी कांदा कुठे विकला, किती विकला आहे? याबाबत तपासणीतून माहिती मिळेल. मुळात सरकारला योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच करायच्या आहेत, याच उत्तम उदाहरण म्हणजे एवढं मोठे गोडाऊन असूनही कांदा दिसून येत नाही. त्यामुळे यात पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला दिसून येत असल्याचे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा गोष्टीवर सरकारने यावर नियंत्रण घातले पाहिजे, नाफेडने बाजार समितीत खरेदी केंद्र सुरु करावं, असेही ते म्हणाले.
कमी झालेले भाव वाढविण्यासाठी.....
'तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा आहे, अशावेळी मग तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात हात घालून कांदा का स्वस्त करत आहेत. तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना? असा सवाल त्यांनी केला. तुम्ही बजेटमध्ये हात घालत नाही, आणि कांदा स्वस्त करता, वाढलेले भाव कमी करण्याची कशी तुमची मानसिकता आहे, तर कमी झालेले भाव वाढविण्यासाठी सरकार का समोर येत नाही, भाव वाढल्यावर हस्तपेक्ष करता, कमी झाल्यावर का करत नाही?' असे सांगत कांदा प्रश्नी बच्चू कडू यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली.
बच्चु कडू यांनी लासलगाव येथील नाफेडच्या गोडाऊनला भेट दिली असता प्रत्यक्षात एक किलो सुद्धा कांदा नाही. मग सरकारची स्व-मालकीची मालमत्ता असताना सरकारी कांदा हा बाहेर खरेदी केला जातो. बाजार समितीत सुद्धा खरेदी केला जात नाही. तो सरकारच्या गोडाऊनमध्ये कांदा ठेवायचा नाही, बाजार समितीत कांदा खरेदी करायचा नाही, कारण बाजार समितीत खरेदी केला, नाफेडच्या गोडाऊनला ठेवला तर त्याच्यात भ्रष्टाचार करता येत नाही. म्हणून याच्यासाठी यंत्रणेने यंत्रणा वापरून केंद्राने सिस्टीमच्या बाहेर जाऊन सर्व काही चालू आहे. आजपर्यंत नाफेडचे अध्यक्ष यांनी स्वतः भ्रष्टाचाराची कबुली दिली. पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं कारवाई होताना दिसत नाही.
- निवृत्ती न्याहारकर, शेतकरी