Namo Shetkari Hafta : अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून सहावा हफ्ता आल्याचा मेसेज देखील येत आहे. तर काही शेतकऱ्यांना मागील थकलेले हप्त्यांचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं निदर्शनास येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Sanman Nidhi) योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते सुरुवातीला पीएम किसान (PM Kisan Scheme) च्या 19 हप्त्याचे 24 फेब्रुवारीला वितरण करण्यात आलं. या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती, मात्र केवळ पी एम किसानचा हप्ता यावेळी मिळाला. त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते.
त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरणासाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता त्यानुसार 31 मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, मात्र आज दोन एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे येऊ लागले आहेत. जवळजवळ २१७० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास सुरवात झाली आहे.
थकीत हफ्ते आणि सहावा हफ्ताही वितरित
शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी दिल्यामुळे आणि मार्च एंडमुळे बँकांच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अखेर आज 2 एप्रिल 2025 पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन-तीन हप्ते मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हफ्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंगमध्ये होते, अशा सर्व शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे.
असे चेक करा स्टेट्स
- सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
- या ठिकाणी Beneficiary Status असा पर्याय दिसेल.
- हे स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबरने देखील पाहू शकता.
- यात तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता.
- मोबाईल नंबर टाकल्यास आपल्याला ओटीपी पाठवला जाईल.
- मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे.
- यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करायचं आहे.
- यानंतर लागलीच आपल्यासमोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल.
- जसे, नाव, पत्ता, यापूर्वीचे हफ्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत, याची माहिती आपल्याला दिसेल.