Join us

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे क्षेत्र वाढलं, फळपिकांसोबत आंबा लागवड वाढली, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 2:49 PM

Nashik News : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेतीबरोबर आंबा पिकाची लागवड देखील वाढली आहे.

नाशिक : द्राक्ष निर्मितीतून नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) नाव सातासमुद्रापार गेलेले आहेच; परंतु आता द्राक्ष व डाळिंबासोबत आंबा पिकाच्या लागवडीतूनही जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध होत आहेत. फळ पिकाचा विचार केला तर द्राक्षानंतर (Grapes) सर्वाधिक लागवड गतवर्षी आंबा पिकाची झाली होती. त्यामुळे या दोन मुख्य पिकांनी संकटांचा सामना करणारे शेतकरी मालामाल झाले. द्राक्षांची एक लाख ५६ हजार टन निर्यात युरोप, आफ्रिका खंडासह आशिया देशांमध्ये झाली. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवडीत (fruit Crops) फळांचा राजा आंबा लागवडीलाच शेतकऱ्यांची पहिली पसंती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात २०२२ ला २,०६४ हेक्टरवर एक लाख ५९ हजार आंब्याची लागवड झाली होती. २०२३ ला लागवड क्षेत्र वाढून ३२०० ते ३५०० हेक्टर इतके झाले. त्यामुळे नाशिकचा आंबाही यंदा बाजारात दिसतोय. यंदा देखील लागवड क्षेत्र वाढलेले असेल. तर दुसरीकडे द्राक्ष ४५ हजार हेक्टर, डाळिंब ३ हजार २०० हेक्टर, १६ हेक्टरवर सीताफळ, १३ हेक्टरवर मोसंबी तर १० हेक्टरवर चिकू लागवड आहे. 

अशी आहे योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूल पिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते. या योजनेमुळेच जिल्ह्यात आंबा पिकाचे लागवड क्षेत्र वाढल्याचे समजते आहे. 

कमी खर्चातून जास्तीचे उत्पादन काढण्यात आले. यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका फारसा बसला नाही. त्याशिवाय वातावरणही समतोल राहिले. भलेही द्राक्षांचा हंगाम यंदा लवकर संपला, परंतु द्राक्ष निर्मितीतून यंदा चांगले उत्पन्न मिळाले. परिसरातील काही शेतकऱ्यांना आंबा पिकाचाही फायदा झाला. - बबन पाटील, शेतकरी

विदेशातही निर्यातद्राक्ष अन् डाळिंबाची यंदा देखील विदेशात निर्यात झाली. रशिया, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आदी देशांमध्ये द्राक्ष निर्यात झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी जिल्ह्यातून ९० टक्के द्राक्ष निर्यात केली जाते. याशिवाय येथील डाळिंब देखील विदेशात जाऊ लागले आहेत. 

टॅग्स :शेतीआंबाशेती क्षेत्रमार्केट यार्डद्राक्षे