नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गोदावरी उजवा व डावा तट कालवा या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाने पाणी घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी उन्हाळ हंगाम 2023-24 साठी पाण्याचा लाभ घेण्याकरिता आपले अर्ज 12 मे 2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपावेतो नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
दरम्यान प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार वर नमूद केलेल्या धरणक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ठराविक क्षेत्रापर्यंत नमुना नंबर 7 प्रवर्गात उन्हाळ हंगाम 2023-24 संरक्षित सिंचनाकरिता विहिरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या ऊस व फळबाग या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळा हंगाम अखेर (30 जुलै 2024) पर्यंत पुरवावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून उर्वरीत पाण्याचा शेतीच्या पिकांसाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुलभ व्हावा, यासाठी मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. पाणी पुरवठामुळे होणारे पिक नुकसानीची जबाबदारी ही त्या शेतकऱ्याची व्यक्तीश: असणार आहे. यासाठी शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही.
ज्या कालव्यावर अथवा चरीवर नमुना 7 ची प्रवर्गात मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा किंवा उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून मंजूरी देण्यात येणार आहे. सहकारी पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर 7 वर पाणी पुरवठा केला जाणार नाही. पाणी वापर संस्थांचे लाभक्षेत्रात सदरची नं 7 वर प्रवर्गात मंजुरी अनुज्ञेय राहणार नाही. संस्थेसही फक्त वर नमुद पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
नुकसान भरपाई मिळणार नाही...
पाटमोट संबंध तसेच जास्त लांबणीवार / उफडा क्षेत्रास पाणी नाकारण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकारी यांना आहेत. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करतांना सूक्ष्म सिंचनावर भर देवून, मंजूर क्षेत्राच्या नादुरूस्त असलेल्या पोटचाऱ्या लोकसहभागातून ताबडतोब दुरुस्त करुन घ्याव्यात. नादुरुस्त पोटचाऱ्यांमुळे पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होऊन, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच उपलब्ध पाणीसाठ्यानुसार आवर्तन कालावधीमध्ये कमी जास्त अंतराने पाणीपुरवठा झाल्याने पिकांचे काही अपरिहार्य कारणाने पाणी कमी मिळून नुकसान झाल्यास त्याबाबत शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
यांना मजुरी मिळणार नाही...
तसेच नमुना 7 वर ज्यांना पाण्याचा लाभ घ्यावयाचा आहे, अशांनी अर्जासोबत 7/12 उतारा जोडणे बंधनकारक आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार सिंचन/ बिगर सिंचनाचे नियोजन करण्यात येईल. याबरोबरच ज्यांच्या नावाचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे व ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा लाभार्थ्यांना मंजुरी दिली जाणार नाही. तसेच कालव्यावरील मंजूर उपसा धारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा पाईप लाईनव्दारा पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर सिंचन अधिनियम 1976 मधील नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असेही कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी कळविले आहे.