नाशिक : पीक उत्पादनवाढ आणि त्या माध्यमातून सजीवांच्या अन्नप्रपंचाची तरतूद करणाऱ्या मधमाशीचं महत्त्व फार मोठं आहे. सृष्टिचक्राच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या या कीटकाबद्दलची रंजक माहिती बसवंत उद्यानात प्रवेश करताक्षणीच मिळू लागते. मी व्यक्तिशः येथे सकारात्मक ऊर्जा अनुभवली, अशा शब्दात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी पिंपळगाव बसवंत येथील बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळे प्रसंगी बसवंत उद्यानातील विविध उपक्रमांचा गौरव केला.
यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की, निसर्गातील मधमाशांचे संवर्धन करून पाळीव मधमाशांचे संगोपन करून शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालनाचे महत्त्व समाजापुढे व शेतकऱ्यांपुढे प्रभावीपणे विविध माध्यमातून मांडण्याचे गरजेचे आहे. त्यांनी बसवंत मधमाशी प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. बी. बी. पवार व कार्यकारी संचालक संजय पवार यांचे कौतुक व अभिनंदन केले. बसवंत मधमाशी उद्यान सारखा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रमध्ये राबवण्याची गरज आहे. परदेशातील शेतकरी कित्येक वर्षापासून पिकाच्या परागीकरणासाठी पाळीव मधमाशांचा वापर करताना दिसून येतात आणि पिकाचे उत्पन्न वाढवून घेतात, हे आपण जाणले पाहिजे.
युवकांना स्वयं रोजगार
कुलगुरू प्रा. सोनवणे अनुभव सांगताना म्हणाले की, एक न्यूझीलंडचा सहकारी मित्राने देखील शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन केले आहे. मध उत्पादनापेक्षा पिकाचे परागीकरण आणि त्यातून उत्पादनातील वाढ हा प्रमुख फायदा शेतकऱ्यांना होत आहे. मुक्त विद्यापीठ मधमाशी पालन कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम राबवीत आहे. युवकांनी या शिक्षणक्रमाचा फायदा घेऊन स्वयं रोजगारातून स्वावलंबी व्हावे. तज्ञांनी मधमाशी पालन या विषयावर पुस्तिका तयार करून या विषयाची उपयुक्तता प्रभावीपणे लोकामध्ये मांडावी. याप्रसंगी कुलगुरूंनी बसवंत मधमाशी उद्यान प्रकल्पाला नेहमीच पाठिंबा राहील अशी भावना व्यक्त केली.
विषय संप्रेषणनातून मधु साक्षरता
विषय तज्ञ डॉ. तुकाराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली यश मधमाशी विकास प्रकल्प मुक्त विद्यापीठात सुरू केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शंभर गावांची निवड करून हा प्रकल्प राबविणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठीचे प्रशिक्षण, मधपेट्यांची व उपकरणांची उपलब्धि करून देणार आहोत. यातून कृषी व पर्यावरणाचा विकास नक्कीच होणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे विषय तज्ञांनी कृतिशील कार्यक्रमाकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. या मधमाशी पालन व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाचा विकास होणार आहे, म्हणून ह्या मधमाशी पालन विकास प्रकल्पातून विषय संप्रेषणनातून मधु साक्षरता साध्य करता येईल, असेही त्यांनी सांगीतले.