अकोला : कंदवर्गीय लसूण सध्या बाजारात भाव खात असून, पाचशे रुपये किलोच्या वर दर पोहोचले आहेत. याच लसणावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रथमच संशोधन करून पांढऱ्या लसणाचे नवे वाण विकसित केले आहे. राज्य शासनाने या वाणाला मान्यता दिली असून, या वाणाचे "पीडीकेव्ही पूर्णा' असे नामकरण केले आहे. लवकरच केंद्र शासनाकडून मान्यता मिळणार असल्याने देशात या वाणाच्या लागवडीसाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून तीन, चार वर्षापासून या कंदवर्गीय लसूण पिकावर येथे संशोधन करण्यात येत आहे. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १८१ च्यावर विविध पिकांच्या जाती, वाण विकसित केले आहे. परंतु लसूण या पिकावरील हे पहिलेच संशोधन आहे. पीडीकेव्ही पूर्णा' वाणाचे उत्पादन हेक्टरी १२० ते १२५ क्चिंटल असून, राज्यात उपलब्ध असलेल्या गोदावरी, श्वेता व भीमा रेड आदी लसणाच्या वाणापेक्षा १५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आहे.
या लसणाची चाचणी देशातील १७ संशोधन केंद्रावर घेण्यात आली असून, या चाचणीत हे वाण सरस ठरले आहे. विशेष म्हणजे देशासह महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यासाठी हे वाण अधिक उपयुक्त व भरघोस उत्पादन देणारे ठरणार असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. सध्या जे लसणाचे वाण उपलब्ध आहेत, त्याचे नुकसान २५ टक्क्यावर आहे. परंतु 'पीडीकेव्ही पूर्णाचे नुकसान १० ते १२ टक्केच्या आत असून, सहा महिने हे पीक टिकून राहत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
१२० क्विंटल उत्पादन
लसणाचे वाण प्रथमच विकसित करण्यात आले असून, हेक्टरी १२० क्विंटल उत्पादन देणाऱ्या या वाणाची राज्याने शिफारस केली आहे. लवकरच केंद्र शासनाकडून अध्यादेश निघणार आहे. संपूर्ण देशासाठी हे वाण आहे अशी माहिती डॉ. पंदेकृवि, मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. एस.एम. घावडे यांनी दिली.
नव्या वाणाला 'पूर्णा' नदीचे नाव
वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यातून पूर्णा नदी वाहते. याच नदीच्या नावावर या पहिल्या संशोधित लसणाच्या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे.