Join us

Cotton Market : कापूस बहरला, नंदुरबार जिल्ह्यात खरेदी केंद्रावर अपेक्षित भावचं नाही, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 1:59 PM

Kapus Bajarbhav : खेतिया येथील बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी तेथेही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) यंदा सव्वालाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड  (Cotton Cultivation 0करण्यात आली आहे. मे, जून महिन्यात लागवड केलेल्या कापसाची वेचणी सुरू झाली आहे; परंतु खरेदीदारच नसल्याने कापसाला सहा ते साडेसात हजार रुपये क्विंटल (Cotton Market) भाव मिळत आहे. खेतिया येथील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी तेथेही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी फारसा उत्साह दाखवत नसल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar Cotton Market) एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत ४० ते ४५ टक्के क्षेत्रात कापूस लागवड केली जाते. खरिपाचे एकूण क्षेत्र दोन लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील जवळपास एक लाख २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात यंदा कापूस लागवड झाली आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यांत सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. सध्या में व जून महिन्यात लागवड केलेल्या कापसाची वेचणी सुरू आहे. प्रतवारीनुसार सहा ते साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. काही ठिकाणी साडेपाच हजार रुपये क्विंटलपासून सुरुवात होत आहे. गेल्या वर्षीदेखील अशीच स्थिती होती. भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी कापूस विक्रीसाठी सरसावत नसल्याचे दिसून येत आहे. 

केंद्र सुरु झाले पण... 

नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या खेतिया येथील कापूस खरेदी केंद्रातदेखील गेल्या आठवड्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु तेथेही अपेक्षित भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. चांगल्यात चांगल्या प्रतीच्या कापसाला येथे साडेसात हजार रुपये  क्विंटल भाव मिळत आहे. किमान पावणेसहा हजार रुपये क्विंटलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे या खरेदी केंद्राकडेदेखील जिल्ह्यातील शेतकरी फिरकत नसल्याची स्थिती आहे. आठ दिवसांपासून केंद्र सुरू होऊनही कापूस घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या ५० पेक्षा अधीक गेली नाही.

शासकीय धोरणावर अवलंबून यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने कापूस बहरला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजनदेखील करून ठेवले आहे. परंतु, हंगामाच्या सुरुवातीलाच अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यापुढील कापूस बाजाराची स्थिती कशी राहील याबाबतही शेतकरी चिंतेत आहेत. येत्या काळात शासकीय धोरण काय ठरते. किमान आधारभूत किमत काय राहते यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

खरेदीसाठी स्पर्धा नसल्याने स्थिती...खरेदीसाठी स्पर्धा नसल्याने भावाबाबत ही स्थिती असल्याचे दिसून येत आहे. आणखी खरेदी केंद्रे सुरू होतील, गावोगावी मोठ्या संख्येने खेडा खरेदीसाठी व्यापारी हजेरी लावतील, त्यावेळी भाव वाढण्याची  शक्यता आहे. नंदुरबार, शहादा येथे खरेदी केंद्र सुरू होत असते. शिवाय सीसीआयतर्फेही खरेदी केली जात असते. त्यामुळे खरेदीसाठी स्पर्धा होऊन भाव वाढत असतो. यंदा दिवाळीपर्यंत ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कापूसनंदुरबारशेती क्षेत्रमार्केट यार्डकॉटन मार्केट