Join us

पालखेड धरण व डावा कालव्यातून बिगर सिंचन आवर्तन, एसारपीएफची तुकडीही तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 8:13 PM

दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील गावांना पालखेड डाव्या कालव्याचे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आलेले आहे. 

नाशिक : पालखेड डाव्या कालव्याद्वारे व कादवा नदीद्वारे दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आरक्षित केलेले आकस्मिक आरक्षणाचे पाणी देण्यासाठी त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद, येवले नगरपरिषद, येवला तालुक्यातील 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेबाव या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यासाठी 26 मार्च 2024 ते 9 एप्रिल 2024 या कालावधीत पालखेड डाव्या कालव्याचे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आलेले आहे. 

चालू वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती, धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणीपुरवठा योजना व प्रासंगिक आरक्षणातील गावांनाच 26 मार्चपासून पालखेड डाव्या कालव्याद्वारे/नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या प्रासंगिक आरक्षणामध्ये येवला नगरपरिषद येवला, मनमाड नगरपरिषद मनमाड, येवला तालुक्यातील 38 गांवे पाणीपुरवठा योजना, येवला तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायत, मध्य रेल्वे मनमाड, काकासाहेब वाघ साखर कारखाना, रानवड, ता. निफाड या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना व कादवा नदीवरील दिंडोरी तसेच निफाड व येवला तालुक्यातील प्रासंगिक आरक्षणातील गावांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची भेट 

दरम्यान हे आवर्तन हे बिगर सिंचनाचे असल्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिक/शेतकरी यांनी पाण्याचा अनधिकृत उपसा करु नये. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर प्रचलित शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल. या कालावधी दरम्यान आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीज पुरवठा खंडीत करणे, पोलीस बंदोबस्त पुरिवणे, राज्य राखील दलाची तुकडी बंदोबस्तासाठी उपलब्ध करून देणे, बंधाऱ्यांवरील अनधिकृत बांधकाम काढून टाकणे इत्यादी कामांचा आढावा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी घेतला. आवर्तनादरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, कालव्यालगतच्या मोटारींचा वीज पुरवठा तात्काळ खंडीत करणे तसेच आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीकांदापाणीकपातपाणीनाशिक