Join us

Transit Treatment Center : उत्तर महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव उपचार केंद्र सुरु, कसं आहे नेमकं स्वरूप? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 3:44 PM

Nashik : नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील (Nashik) काही भागांत वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण असल्याने बिबट्यासह अनेक वन्यप्राणी आढळून येतात.  पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांवर तात्काळ उपचार होण्यासाठी ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटर (Transit Treatment Center) उभारण्यात आले आहे. अखेर हे उपचार केंद्र सुरु करण्यात आले असून  वन्यप्राण्यांवर उपचार करता येणे सोयीस्कर होणार आहे. 

पश्चिम भाग, नाशिक वनविभागाकडून (Nashik Forest) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन्यजीवांवर वेळेत उपचार होण्यासाठी अपंगालय (Transit Treatment Center) उभारले आहे. नाशिक व इतर परिसरातील  नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांनी ज्या वन्यजीवांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यांना या अपंगालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक पश्चिम भाग, नाशिक पंकज गर्ग यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. हे अपंगालय चालविण्यासाठी रेक्सू चॅरिटेबल ट्रस्ट, गोखले रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे यांच्याशी 23 फेब्रुवारी 2024 रोजी  करार होवून अपंगालय सुरू करण्यात आले आहे. 

नाशिक शहर परिसरात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची-1 मधील वन्यजीव बिबट व तत्सम वन्यप्राणी यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपघात किंवा अन्य कारणांमुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. तसेच संगमनेर, मालेगांव व अहमदनगर विभागातून सुद्ध जखमी वन्यप्राणी उपचारसाठी येतात. यात अजगर, बिबट, तरस, स्टार प्रजातीची कासवे, गरूड व गिधाड या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. अशा जखमी वन्यप्राणी व पक्षी यांना यापूर्वी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुणे येथे पाठवावे लागत होते. परंतु आता वेळेत उपचार मिळण्यासाठी नाशिक येथेच अपंगालय (Transit Treatment Center) सुरू करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

उपचार केंद्रात काय काय सुविधा मिळतील? 

दरम्यान या उपचार केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे, एमआरआय कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधालयअसे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार आणि बचाव साहित्यासाठी कक्ष असतील. मृत वन्यजीवांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. या केंद्रात बिबट्यांसाठी 4 कक्ष, लांडगे, कोल्ह्यांसाठी- 5 कक्षांसह वाघांसाठी एक स्वतंत्र कक्ष असतील. विविध प्रजातीच्या पक्ष्यांसाठी 25 कक्ष असतील. माकड,वानरांसाठी-2 कक्ष असतील. तसेच केंद्रात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल.

टॅग्स :नाशिकशेतीवन्यजीवबिबट्याशेती क्षेत्र