अनेकदा शेतकऱ्यांना बँकांची कामे, सरकारी योजनांचा लाभ ओळखपत्र अशा विविध कामांसाठी आधार कार्ड लागते. मात्र, आधार कार्डमध्ये कधी-कधी काही दुरुस्ती किंवा बदल अपेक्षित असतात. मग त्यासाठी आपल्याला जवळील आधार केंद्रावर जावे लागते. यात बराच वेळ खर्ची होतो. मात्र, आता पोस्टातून आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. गावागावात ही सुविधा टपाल विभागाने सुरू केली आहे.
गेल्या अनेक वर्षात पोस्टाच्या कामात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. याशिवाय पोस्टाचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. पोस्ट विभाग आता टपालापुरता मर्यादित न राहता बँकिंग सेवेतही पोस्टाने चांगले काम सुरू केले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) निधीतील लाभार्थीची प्रलंबित बँक खाती आधार कार्डशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. त्याचाही चांगला फायदा झाला. गावातील व्यक्तीला आधार कार्डसाठी तालुक्याच्या ठिकाणी किवा शहरात जाण्याची गरज आता राहणार नाही. आधार कार्डसाठी होणारी पायपीट थांबेल. गावातच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे.
नवीन आधार कार्ड
गावातील पोस्ट ऑफिस कार्यालयात नवीन आधार कार्ड बनविले जाणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी गावातच सोय होणार आहे. गावातील पोस्ट कार्यालयात आता आधार अपडेटची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी नागरिकांना १०० रुपये किमान शुल्क भरावे लागणार आहे.
कोणकोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड काढण्यासाठी जन्माचा दाखला तसेच आई किवा वडिलांचे आधार कार्ड सोबत आणावे लागते. ज्यांचे आधार कार्ड काढायचे आहे, त्यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. तर नवीन आधार कार्ड मोफत काढण्यात येणार आहे.
आधार काढून दहा वर्षे झाले, अपडेट करा
आधार कार्ड काढून दहा वर्षे झाली असेल आणि अपडेट करायचे असल्यास तुम्हाला इतरत्र जाण्याची किंवा जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. पोस्टमन तुमचे काम करून देणार आहे.
आधार लिंकिंग
प्रत्येक ५ वर्षांनी आधार अपडेट आणि आधार लिंक करणे आवश्यक झालेले आहे. यासाठी पोस्ट कार्यालयात आता आधार लिंकिंग फक्त ५० रुपयांत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच पोस्टात सर्व सेवासुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आधार कार्डसह बैंकिंग सेवाही जनतेसाठी असून, सेवासुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सब पोस्टमास्तर विशाल उईके यांनी केले आहे.