नाशिक : आधुनिक काळात शेतीची मशागत (Farming) ट्रॅक्टर व यंत्रांच्या साहाय्याने करत असल्याने मशागत व पेरणीसाठीची (Cultivation) लाकडी अवजारे कालबाह्य झाली आहेत. पूर्वी शेतकरी मान्सूनपूर्व काळातच मशागती व पेरणीसह इतर कामांसाठी लागणाऱ्या अवजारांची तयारी सुतार कारागिरांकडून करून घेत होते. मात्र आता नांगर, पांभर, तिफण, वखर आदींसारख्या लाकडी अवजारांची जागा लोखंडी आधुनिक अवजारांनी घेतली. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे दुर्मिळ झाली आहेत.
स्वातंत्र्यपूर्वकाळात शेतकरी व सुतार कारागीर यांच्यातील आर्थिक व्यवहार हा सामान्यतः वस्तू विनिमय पद्धतीने होत असे. त्यावेळी या कामाच्या ठिकाणी शेतकरी वर्गाची लगबग दिसत होती. नवीन अवजारे बनविणे, जुन्या अवजारांची दुरुस्ती करणे यासारखी कामे सूतार कारागीर करीत होते. यात शेतीसाठी लागणाऱ्या बारीक सारीक गोष्टींचा समावेश असे. सध्या आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना कारागिरांना श्रमाच्या मानाने मिळणारी मजुरी ही पुरेशी ठरत नाही. नांगर, पांभर, तिफण, वखर आदींसारख्या लाकडी अवजारांची जागा लोखंडी आधुनिक अवजारांनी घेतली.
सध्याचा शेतकरी आधुनिक शेतीसह आधुनिक अवजारे वापरण्यावर भर देत आहे. त्यामुळे लाकडी अवजारांच्या जागी बाजारपेठेसह ग्रामीण भागात लोखंडी व अत्याधुनिक बनावटीचे शेती अवजारे दाखल झाली. बैलांच्या साहाय्याने केलेली कामे ट्रॅक्टर व पॉवरटीलरने केली जाऊ लागली. याचा परिणाम ग्रामीण भागातील सुतार कारागीरांच्या व्यवसायावर झाला असल्याचे दिसून येते. लाकडी अवजारे जवळजवळ कालबाह्य झाली असून, पारंपरिक शेतीची यांत्रिक शेतीकडे वाटचाल होत असताना लाकडी घडवणीची कामे बंद झाली. त्यामुळेच सुतार कारागीर दुर्मिळ झाले आहेत.
आधुनिक अवजारांची चलती
साधारणपणे औत म्हणजेच नांगर, तिफण, पाभर, आळवट, रुमणे इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात. माणसांकडून किंवा जनावरांकडून अवजारे वापरता यावी याचा विचार करुन अवजारे तयार केली जात. अवजारे बाभळ, खैर, सागवान या उपलब्ध लाकडापासून ही अवजारे बनवली जात. खेडयातील सुतार व लोहार यांसारखे कारागीर त्यांची जडणघडण व दुरुस्ती करत. आजच्या आधुनिक शेतीच्या युगात या अवजारांमध्ये काही सुधारणा घडवून आणून ती शेतीला अधिकाधिक उपयुक्त कशी बनवता येतील याबाबत विचार केला जात असल्याचे चित्र आहे.