- गणेश बागुल
नाशिक : भारत हा कृषी प्रधान देश असून प्राचीन काळापासून शेती (Farming) हा व्यवसाय चालत आला आहे. पारंपारीक शेती करता करता त्याला आता तंत्रज्ञानाची जोड मिळाली. परंतू तंत्रज्ञानाच्या काळात शेतीला लागणारे काही साहित्य दुर्मिळ होत चालले आहे. असं म्हणण्यापेक्षा कुठे ते दिसतही नाही, आणि असले तरी त्याचा फारसा वापर होत नाही. या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतकऱ्याला पेरणीसाठी (Crop Cultivation) लागणारे 'वरणाळे' आठवडे बाजारात दृष्टीस पडले.
सटाणा (Satana) शहरात भरत असेलल्या आठवडे बाजाराला तालुक्यातील गाव पाड्यातील नागरीक येत असतात. अशात कसमादे परिसरात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पेरणी काही ठिकाणी सुरू आहे. खत बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी दुकानात दिसत आहे. पारंपारीक शेती करतांना बैल जोडीच्या साह्याने शेती केली जायची. परंतू १५ दिवस किंवा महिना भर चालणारे पेरणीचे काम आता तंत्रज्ञानामुळे काही दिवसात संपते. आता शेतकऱ्यांच्या गोठ्यांची जागा बैलाऐवजी ट्रॅक्टरने घेतली आहे. परंतू सर्वच काम ट्रॅक्टरने होत नाहीत, त्यासाठी बैलजोडी लागतेच. यातच बाजरी, भुईमुंग, कुळीद, मुंग, सोयाबिन पेरणीसाठी लागणारे 'वरणाळे' विक्रीसाठी बाजारात दिसून आले.
अनेक नागरिकांनी वरनाळे पाहुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'आमच्याकडे होत असं म्हणत, त्याकाळी पेरणी याच वर्नाळ्यातुन केली जात असे. लासलगावच्या नादराबाई सखाराम शिखलकरी या वरणाळ विक्री करणाऱ्या आजीशी संवाद साधला असता, आजी म्हणाली, पुर्वी वरणाळे, पाभर, जुवाड, बखर, कोळपी यांची खुप मागणी असायची परंतू आता तस फारसी काही मागणी नाही, आमचही वय झालं, घरातील मुलांनी वेगळे व्यवसाय निवडले, म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांनीही वापर बंद केला. यामुळे नवीन कोणी या व्यवसायात पडत नाहीत.
आता कारागीरही राहीले नाहीत. लाकुड महाग झाले, काम मेहनतीचे आहे. याची किंमत ४०० रूपये सांगितली तर ते जास्त पैसे वाटतात, परंतू या वस्तू एकदा जर घेतल्या तर १० वर्षापेक्षा अधिक वर्ष त्यांना आयुष्य असल्याचे आजीने सांगितले. आजही तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारीक वस्तू शेतीसाठी लागतातच, पण त्या वस्तू तयार करणारे हात आता कमी झाले आहेत.
एकवीसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना प्रगत भारत देशात विज्ञानाने कृषीक्षेत्रात आधुनिकतेने एवढी मजलं मारली की जुन्या रूढी परंपरांचा ऱ्हास होताना दिसतो आहे. त्याचाच एक भाग बैलजोडी, पाभर, वर्णाळे या शेती उपयोगी गोष्टींना आज वाईट दिवस आलेले बघावयास मिळते आहे. त्याचाच परिणाम काही छोट्या लघु उद्योगांवर सुद्धा होताना दिसतो आहे.
- गोकुळ गांगुर्डे, प्रगतिशील शेतकरी, जुनी शेमळी