Nashik Onion Farming : यंदा ऐन नवरात्रोत्सवात (Navratri) पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा बियाणे (उळे) शेतकऱ्यांना शेतात टाकता येत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तसेच अनेक भागातील कांदा पिकाचे नुकसान झाले असून जांभळा करपा आणि पीळ रोग येण्याची शक्यता आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी (onion Farming) प्रथम रोपे तयार करण्यासाठी कांदा बियाणे टाकण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर महिन्यात कांदा लागवड करण्यास सुरुवात होते. नवरात्रोत्सवातील एक ते नऊ माळीचा कालावधी हा कांदा बियाणे टाकण्याचा असतो. यामध्ये जर कांदा बियाणे वेळेवर टाकले तर कांदा लागवड डिसेंबर महिन्यात होऊन पूर्णतः थंडी कांदा पिकाला मिळून पीक चांगले येते. त्यामुळे शेतकरी वर्ग नेहमीच या बाबतीत जागरूक राहून आपापल्या शेत कांदा बियाणे (उळे) टाकण्यासाठी त्या जमिनीत ताग, मूग आदी पिके करून जमीन सुपीक करून ठेवतो.
ओलसरपणामुळे रोपांवर रोगांची भीती
कांदा बियाणे (उळे) टाकण्यास विलंब झाला तर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यात जमिनीत मुरलेले पाणी बाष्पीभवन होण्यास विलंब, शिवाय ओलसरपणामुळे जमिनीत बुरशी तयार होऊन बीज उगम क्षमतेत अडचण येऊन रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.
कांदा पिक सल्ला
परतीच्या पावसामुळे कांदा पिकामध्ये जांभळा करपा किंवा पीळ रोग येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी व्यवस्थापनासाठी पुढील प्रमाणे बुरशीनाशकाच्या आलटून पालटून फवारणी घ्याव्या. झेड -७८ १.५ ग्रॅम/लिटर किंवा फोलिक्यूअर १ मिली/लिटर किंवा बेनलेट १ ग्रॅम /लिटर व सोबत त्यामध्ये विद्राव्य खत १३:००:४५ ७५ ग्रॅम/पंप प्रमाण घेऊन फवारणी करावी, असा सल्ला मालेगाव केव्हीकेचे पिक संरक्षण तज्ञ विशाल चौधरी यांनी दिला आहे.