भाजीपाला पिकांमध्ये कांदा हे महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्राखाली असलेले पीक आहे. महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ सर्वच जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचे चांगल्या प्रतीचे अधिक हेक्टरी उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातीचे शुध्द बियाणे वापरणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत अनेक भागात उन्हाळ कांदा लागवड पार पडली असून लागवडीनंतर कांदा पिकाची कशी काळजी घ्यावी, ही देखील शेतकऱ्यांनी समजून घेणे महत्वाचे आहे.
बिजोत्पादनाच्या दृष्टीने कांदा हे व्दिवार्षिक पीक पध्दतीमध्ये येते, म्हणजेच पहिल्या हंगामात बियांपासून कांदे तयार करतात आणि दुसऱ्या हंगामात कांदे लावून त्यापासून बियाणे तयार करतात. बियाणे तयार करण्यासाठी कांद्याची लागवड रब्बी हंगामात करावी लागते. अधिक उत्पादनासाठी फुलोरा व बी धारणेच्या सुरूवातीला थंड हवामान आवश्यक आहे. या काळात ढगाळ व पावसाळी वातावरण हानीकारक ठरते. बीजधारणा होऊन ते पक्व होण्याच्या सुमारास तसेच काढणीच्या वेळी हवा कोरडी, भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान पोषक ठरते.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा लागवड झाली असून आता शेतकाऱ्यांकडून आगामी काळात कांदा पिकाचे व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू आहेत.
अशी काळजी घ्या..
दरम्यान कांदा लागवडीनंतर नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत मालेगाव कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ पवन चौधरी यांनी आवाहन केले आहे. ते म्हणाले की, थंडीपासून कांदा पिकाचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार पाणी / तुषार सिंचन च्या सहाय्याने द्यावे. कांदा या पिकावर कमाल व किमान तापमानातील मोठ्या फरकामुळे रस शोषणाऱ्या फुलकिडे व करपा या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ ईसी. ६ मिली. अधिक टेब्यूकोनॅझोल १० मिली अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
कृषी विषयक बातम्या मिळवण्यासाठी लोकमत ॲग्रो व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा