Join us

Onion cultivation : कांदा रोपवाटिका व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:41 PM

Onion Crop Management : एक एकर कांदा लागवडीसाठी (onion Cultivation) २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.वाचा सविस्तर

Onion Crop Management : सध्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कांदा पट्ट्यात (Onion farming) कांदा बियाणे रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अशावेळी नेमके कांदा रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे? याबाबत या लेखातून सविस्तर माहिती घेणार आहोत. 

एक एकर कांदा लागवडीसाठी (onion Cultivation) २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी २-३ किलो बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझीम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरिडी वापरून जमिनीत मिसळावे. रोपवाटिकेस सुरुवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते. 

तसेच रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंच, १-१.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात. वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत. रुंदीशी समांतर ५-७.५ सें. मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें. मी. खोलीवर बियाणे पेरावे. 

दरम्यान पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पध्दतीने पाणी द्यावे. अति उष्णतेमुळे बियांची उगवण व रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी वाफ्यावर दुपारच्या वेळी सावली राहील अशी सोय करावी. तण नियंत्रणासाठी रोपे उगण्यापुर्वी वाफ्यावर पेंडीमिथैलीन २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.

संकलन : विभागीय संशोधन केंद्र,  इगतपुरी (हा कृषी सल्ला केवळ नाशिक जिल्ह्यापुरता दिलेला आहे) 

टॅग्स :कांदाशेतीशेती क्षेत्रलागवड, मशागत