Join us

Chhagan Bhujbal : पीएम मोदींसमोर कांदा प्रश्न मांडणार, भुजबळ यांचे कांदा उत्पादकांना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 5:39 PM

पिंपळगावच्या पीएम मोदींच्या सभेत कांदा प्रश्न मांडणार असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिक : पीएम मोदींच्या पिंपळगावच्या सभेत मला बोलायची संधी मिळाली तर नक्कीच कांद्याच्या प्रश्नावर पंतप्रधानांचे लक्ष वेधेल, तसेच शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील पत्रकार परिषदेत दिले. त्यामुळे उद्या होणाऱ्या पीएम नरेंद्र मोदींच्या सभेत कांदा प्रश्नावर मोदी काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत कांदा प्रश्न मोदींसमोर मांडणार असल्याचं सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा प्रश्न टिळक आहे. कधी निर्यात बंदी करतात, तर कधी निर्यात खुली करतात. त्याऐवजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव ठरवून द्या तेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, त्यानंतर तुम्हाला जे काही बंधन टाकायचे असतील ते टाका, मात्र एकीकडे अस्मानी संकट सुरूच आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

तसेच ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा उपायोजना करण्यावर भर द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये. एकीकडे क्विंटलला हजार रुपये खर्च येत असताना दुसरीकडे पाचशे आणि सहाशे रुपये क्विंटल कांदा जात असेल तर शेतकऱ्यांना परवडणार कसं? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. जसे गहू, तांदूळ या पिकांना हमीभाव जाहीर केला आहे. त्याप्रमाणे शासनाकडून खरेदी पण केली जाते. शिवाय विदर्भातील धानाला देखील हमीभाव दिला जातो, तसेच शासनाकडून बोनस देखील दिला जातो. अशा पद्धतीने कांद्याच्या बाबतीत देखील शासनाने योजना आखणं गरजेचं असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

पिंपळगावला मोदींची सभा . लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान कांदा पट्ट्यातील महत्त्वाचे बाजारकेंद्र असणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे १५ मे रोजी सभा घेणार आहे. त्या सभेची तयारी सुरू आहे. कांद्याच्या भाव कमी असल्याने कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. वेळेवर निर्यात खुली केली नाही आणि जेव्हा निर्यात खुली केली, तेव्हा त्यात अटीच जास्त ठेवल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव पुन्हा गडगडण्यावर होत आहेत.

टॅग्स :नाशिककांदाछगन भुजबळनरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०२४