नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व साक्री तालुक्यात होणारे कांदा उत्पादन व होणारी कांदा आवक लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची मार्केटप्रमाणेच कांदा मार्केटदेखील गजबजण्याची शक्यता आहे. बाजार समितीत सद्य:स्थितीत जागा नसल्याने हे मार्केट साक्री रस्त्यावरील आरटीओ कार्यालयानजीक सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कांदा उत्पादकांना स्थानिक ठिकाणीच कांदा विक्रीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, रनाळे, आष्टे, धानोरा परिसरात, तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा, विसरवाडीसह इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. शेजारीच असलेल्या साक्री तालुक्यात देखील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील शेतकयांना चांगला भाव मिळावा, यासाठी इंदूर, सुरत, दिल्ली पिंपळगाव, लासलगाव या मोठ्या मार्केटमध्ये जाऊन कांदा विकावा लागत असतो. त्यात शेतकऱ्यांचा प्रवासातील वेळ वाया जातोच शिवाय लिलावासाठी काही दिवस वाट पाहावी लागते.
भाव चांगला मिळालाच तर ठीक, नाही तर वाहन भाडे देखील वसूल होत नसल्याची स्थिती शेतकऱ्यांची असते. त्यामुळे स्थानिक भागात कांदा मार्केट सुरू झाल्यास कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. त्यानसार नंदरबार बाजार समितीने कांदा मार्केट सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. अखेर त्या मागणीची दखल घेत नंदुरबार बाजार समितीने नव्याने कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांचा वेळ व वाहतूक खर्च वाचणार!
नंदुरबार जिल्ह्यात कांदा मार्केट नाही. नंदुरबार जिल्ह्यातील पहिले कांदा मार्केट सुरू होत आहे. लगतच असलेल्या निजामपूर, दहिवेल येथे खाजगी मार्केट आहे. पिंपळनेर येथेही मार्केट आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरी ठोक स्वरूपात इंदोर, सुरत, दिल्ली, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीसाठी नेतात. उरलेला अर्थात सी ग्रेडचा कांदा स्थानिक स्तरावर विक्रीसाठी नेतात. आता ठोक स्वरूपात कांदा मार्केट सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा कांदा या ठिकाणी विक्रीसाठी आणण्याची संधी राहणार आहे. वेळ आणि वाहतूक खर्च देखील वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो, अशी शक्यता आहे.