नाशिक : कसमादे भागात यावर्षी रबी हंगामात लाल व काही प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मात्र, फेब्रुवारीच्या सुरवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने विहिरींचे पाणी कमी होऊ लागल्याने कांदा पीक वाचवण्यासाठी कूपनलिका करत, तसेच विहिरी खोल खोदत पाण्याचा शोध घेण्याची शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. लवकरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याने यंदा कांदा उत्पादन घटणार आहे, अशी भीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यात लाल कांद्याचे भाव गडगडल्याने झालेला खर्चही वसूल होत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे.
यंदा कांदा निर्यात बंदीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अशातच आता उन्हाळ कांद्याची लागवड देखील झाली आहे. मात्र दुसरीकडे यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सद्यस्थितीत अनेक पाण्याचे साधने कोरडी झाली आहेत. विहिरी, नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे वापरून कांद्याची यावर्षी मोठ्या अपेक्षेने लागवड केली; परंतु जानेवारी महिन्यातच विहिरींचे पाणी कमी पडू लागल्याने उन्हाळ कांद्याला फटका बसू लागला आहे. ज्या भागात लाल कांद्याचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असला, तरी त्यासही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
कसमादेच्या पश्चिम भागात पाणी मुबलक असले तरी पूर्व भागात मात्र पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शेतातील कांदा पीक वाचवण्यासाठी तसेच काहींनी डाळिंबबागा धरल्या असल्याने पाण्याची गरज ओळखून कूपनलिका खोदण्याचा धडाका शेतकऱ्यांनी लावला आहे, तर काहींनी विहिरीत आडवे बोअर करत पाण्याचा शोध कायम ठेवला आहे, तर काही शेतकरी विहिरी खोल खोदकामाचा पर्याय अजमावून पाहत आहेत. यामुळे खर्चात वाढ आणि उत्पादन मात्र काहीच नाही, असे चित्र असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिचून गेला आहे.
पाण्याची तजवीज करण्याचा प्रयत्न
यंदा कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने उत्पादन खर्च वसूल झाला नाही. मात्र, यावर्षी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कांद्याची रोपे सडून गेलीत. यामुळे अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. कमी होणारे पाणी व उपलब्ध न झालेले कांदा रोप यामुळे शेत मोकळे ठेवून लागवड करण्यात आली आहे. कांदा पिकाची होरपळ होऊ नये, म्हणून बोअरवेल करत आतापासूनच पाण्याची तजवीज करण्याचा प्रयत्न चालू आहे. काहींना पाणी लागले तरी ते टिकेल याची शाश्वती नाही, असे कांदा उत्पादक शेतकरी नानाजी अहिरे यांनी सांगितले.