मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर दररोज पहाटे पडणारे धुके, दवबिंदू व ढगाळ वातावरणाचा फटका कांदा पिकास बसला असून, करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होऊन धोक्यात आले आहे. काही कांदा जमिनीतच सडला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी महागडी औषधे व बुरशीनाशकांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाटोदा परिसरात पाहावयास मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला, लासलगाव, पिंपळगाव, देवळा, सटाणा आदी परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या अल्पशा पाण्यावर पोळ व लाल कांद्याची लागवड केली; मात्र लागवड केलेला व काढणीस आलेल्या कांदा पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने सर्वच हिरावून घेतले आहे. त्यामुळे काढणीला आलेला कांद्याचे नुकसान जमिनीत असलेला कांदा सडू लागल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कांद्याचे नुकसान
कमी पाणी असताना लागवड केलेला व काडणीस आलेल्या कांदा पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा दुखी झाला.
शेतकरी समाधान बोराडे म्हणाले की, अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसला आहे. पाऊस झाल्याने शेतातील कांदा जमीनतच सडुन गेला आहे. त्यामुळे आता खर्चही वसूल होणार नसल्याचं ते म्हणाले. कृषी सहाय्यक शिवाजी मुळे म्हणाले की, रब्बी पिकांच्या वाढीसाठी थंडीची गरज आहे. मात्र ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
विविध रोगांचा प्रादुर्भाव
कांदा पिकावर करपा, मावा, तुडतुडे व मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. सर्वाधिक फटका काढणीस आलेल्या कांदा पिकाच बसला आहे. अवकाळी पाऊस व दवबिंदूमुळे पाणी जमिनीत मुरली असून यामुळे अति पाण्यामुळे तयार कांदा हा जमीन करत असल्याचा शेतकरी सांगत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे धास्तावलेला शेतकरी रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळ संध्याकाळ महागड्या औषधांची तसेच बुरशीनाशकांची फवारणी करत आहे.