Join us

'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 5:03 PM

जर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठविली नाहीतर दिल्लीपर्यत धडक देऊ ' असा इशारा कांदा रथ यात्रेतून शेतकऱ्यांनी दिला आहे. 

'केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असून एक वेळ आमचा बाप परदेशात गेला नाही तरी चालेल, परंतु आमचा कांदा परदेशात गेला पाहिजे. कांदा परदेशात निर्यात केला तरच शेतकऱ्यांला दोन पैसे मिळतील व त्याची उन्नती होईल. जर केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठविली नाहीतर दिल्लीपर्यत धडक देऊ ' असा इशारा कांदा रथ यात्रेतून शेतकऱ्यांनी दिला आहे. 

केंद्र निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकरी असतील, कांदा उत्पादक संघटनांच्या माध्यमातून वेळोवळी सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. मात्र निर्यातबंदी कायम असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवरच बागलाण तालुक्यात कांदा रथाचे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट यात्रेच्या माध्यमातून निर्यात खुली करण्यासाठी सरकारला जाब विचारण्यात आला. 

सटाणा परिसरातील मोरेनगर येथील व्यंग चित्रकार किरण मोरे व केशव सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतुन कांदा रथ तयार करण्यात आला होता. ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरापासून ठेंगोडा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या माध्यमातून कांदा रथ यात्रेस शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव घसरले असून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. यावेळी केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी, गडगडलेले भाव, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चुकलेले आर्थिक गणित यामुळे अडचणीत आल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे केंद्र सरकारच्या कारभारावर यावेळी ताशेरे ओढण्यात आले. 

कांदा आमच्यासाठी देव... 

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी वेठीस धरला आहे. एवढ्या मेहनतीने कांदा पिकाची लागवड करून उत्पादन घेतले जाते. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते. अशावेळी ज्या कांद्याला आम्ही देव मानतो, मात्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकवेळ आमचा कुटुंबातील कुणीही सदस्य परदेशी गेला नाही तरी चालेल, मात्र आमचा कांदा परदेशी गेला पाहिजे, अशी भूमिका मांडत निर्यात बंदी कायम स्वरूपी खुली करा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीबाजारकांदाशेतकरी आंदोलननाशिक