Join us

Onion Seed Sowing : पहिल्यांदाच तिसऱ्या टप्प्यात उन्हाळ कांद्याचे बियाणे टाकण्याची वेळ, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 7:20 PM

Onion Seed : नाशिक जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात आठ दिवस झालेल्या परतीच्या पावसाने दोन्ही टप्प्यातील कांद्याची रोपे पावसाने पूर्णतः खराब झाले.

नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची (Summer Onion Plant) रोपे टाकली होती. मात्र नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कांदा पट्ट्यात आठ दिवस झालेल्या परतीच्या पावसाने दोन्ही टप्प्यातील कांद्याची रोपे पावसाने पूर्णतः खराब झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नव्याने उन्हाळ कांद्याचे बियाणे घेण्याची वेळ यंदा आली आहे. 

यावर्षी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याचे टाकलेले रोपे (Onion Seed) परतीच्या पावसाने पूर्णतः खराब झाल्याने, शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात उन्हाळ कांद्याचे बियाणे टाकण्याची वेळ आली असून, यामुळे उन्हाळी कांदा बियाणे विक्रेत्यांनी बियाण्याची कृत्रिम टंचाई भासवून, बियाण्याच्या किमती वाढविल्याने, शेतकऱ्यांना महागड्या दरात कांदा बियाणे घ्यावे लागले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे नामांकित बियाण्याची टंचाई निर्माण झाल्याने, घरगुती बियाणे देखील मिळणे दुरापास्त झाल्याने उन्हाळ कांद्याच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. 

शिवाय तिसऱ्या टप्प्यात बियाणे साठी शेतकऱ्याला अधिकचे पैसे मोजावे लागल्याने शेतकरी कृषी विभाग व बियाणे विक्रेत्यांवर तसेच उन्हाळ कांद्याचे बियाणे उत्पादक कंपनी यावर यंदा नाराज असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच गेल्या दोन तीन वर्षांपासून बऱ्याच उन्हाळा कांद्याच्या बियाणांचा उतार समाधानकारक मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची ओरड असून बऱ्याच उन्हाळी कांदा बियाणे कंपन्या बियाण्यात भेसळ करत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

रोप परतीच्या पावसाने खराब

कळवण तालुक्यातील पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, विसापूर, बगड्डू, भादवण, बिजोर यासह परिसरातील शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे बियाणे ( रोप) टाकण्यात व्यस्त झाले आहे. दोन्ही टप्प्यातील रोप परतीच्या पावसाने खराब झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा उन्हाळ कांद्याचे बियाणे घेऊन तिसऱ्या टप्प्यात उन्हाळ कांद्याचे बियाणे टाकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जुन्या जाणकार शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शेतकरी रेन पाइप, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, तुषार सिंचन या आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. 

यंदा परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची उन्हाळी कांद्याचे रोपे हे खराब झाल्याने बियाण्याची टंचाई निर्माण झाल्याने अधिकचे पैसे देऊन शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे घ्यावे लागले. शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून घरी बियाणे बनवणे बंद केले आहे. यापुढे शेतकरी घरगुती उन्हाळी कांद्याचे बियाणे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणार असल्याचे शेतकऱ्यांचे यंदा एकमत झाले आहे. - दादाजी जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, पिळकोस 

टॅग्स :कांदानाशिकपेरणीलागवड, मशागतपाऊस