Join us

Onion Theft : चोरांचा कांद्यावर डोळा, तब्बल साडे पाच लाखांचा कांदा ट्रॅक्टरसह पळवला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:28 PM

Onion Theft : एकीकडे कांद्याला समाधानकारक दर मिळत असताना नाशिकच्या देवळ्यातून अजब प्रकार समोर आला आहे.

नाशिक : एकीकडे कांद्याला समाधानकारक दर (Onion Market) मिळत असताना नाशिकच्या देवळ्यातून अजब प्रकार समोर आला आहे. सरस्वतीवाडी येथील शेतकरी विजय झिपरू आहेर यांच्या मालकीचा कांदे भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

देवळा रस्त्यावरील (Deola) सरस्वतीवाडी (आहेर वस्ती) शिवार येथील प्रगतिशील शेतकरी विजय झिपरू आहेर (गट नंबर ९८) यांनी रविवारी आपल्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विक्रीसाठी सुमारे ३० ते ३२ क्विंटल कांदा भरलेला होता. सोमवारी मार्केट बंद असल्याने मंगळवारी सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरलेला कांदा विक्रीसाठी नेण्यात येणार होता. मात्र, विजय आहेर यांचा मळा राष्ट्रीय की महामार्गाला लागून असल्याने चाळीचे शेड व पाठीमागे जवळच आहेर यांचे राहते घर असल्याने या शेडमध्ये कांदा भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसह उभा होता. 

दरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास आहेर कुटुंबीयांनी याबाबत खातरजमा करून सदर शेडला दोन्ही बाजूंनी कुलूपही लावले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा ट्रॅक्टर (क्रमांक एम एच४१ जी ३८३) कांदा भरलेल्या शेडचे कुलूप तोडून लंपास केला असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आहेर यांचे आजच्या बाजार भावानुसार सुमारे ३२ क्विंटल कांद्यासह एकूण साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

कांद्याला समाधानकारक दर 

सध्या कांद्याला योग्य दर मिळत असल्याने कांद्याने भरलेल्या ट्रोलीसह ट्रॅक्टर चोरीला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. गेल्या दहा वर्षापूर्वीही कांद्याला ५ ते ६ हजार क्विंटल भाव मिळत असताना किकवारी, धांदी परिसरातही कांद्याने भरलेले ट्रॅक्टर चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी या चोरांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र या घटनेने संबंधित शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डचोरी