Join us

रोजगार हमी योजनेची ऑनलाईन हजेरी, रोजगार हमीच्या सर्व कामांसाठी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:34 PM

रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांची हजेरी आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा नवा नियम अंमलात आणला आहे.

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांची नॅशनल मोबाइल मोनिटरिंग सिस्टिम या मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन हजेरी घेण्याचा नवा नियम केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून अंमलात आणला आहे. यापूर्वी रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांची संख्या वीसपेक्षा अधिक असेल, तरच मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन हजेरी घेतली जात असे. मात्र, केंद्र सरकारने मोबाइल अॅपद्वारे हजेरीचा नियम रोजगार हमीच्या सर्व कामांसाठी लागू केला आहे.

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागात मजुरांना किमान शंभर दिवस काम मिळावे तसेच मालमत्तेची निर्मिती व्हावी, असा उद्देश आहे. या दृष्टीने ग्रामपंचायत, कृषी, वन, लघु पाटबंधारे, जलसंपदा, बांधकाम आदी विभागांच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतून कामे प्रस्तावित केली जातात. मागेल त्याला काम या धोरणानुसार ग्रामपंचायत या वेगवेगळ्या विभागांमध्ये कामे प्रस्तावित करीत असते. रोजगार हमी योजनेतून केवळ मनुष्यबळाचा वापर करून काम पूर्ण करण्यावर मर्यादा असल्याने सरकारने प्रत्येक कामात कुशल व अकुशल कामे अशी विभागणी करून त्याचे प्रमाण 60:40 असे निश्चित केले आहे. त्यामधून 60 टक्के काम यंत्राच्या साहाय्याने व 40 टक्के काम मजुरांच्या साहाय्याने करण्याचे धोरण ठरवले आहे.

मजूर कामावर असल्यास त्वरित हजेरी

सद्य:स्थितीत राज्यात या कायद्यांतर्गत प्रमुख दोन योजना सुरू आहेत. त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेंतर्गत केंद्र शासन 100 दिवस प्रतिकुटुंब रोजगाराची हमी देते व 100 दिवस प्रतिकुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरविते. प्रतिकुटुंब 100 दिवसांवरील प्रत्येक मजुराचा मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. या अॅपमधून हजेरी घेण्यासाठी सकाळी 9 ते 11 व दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळा असून नेमके त्याच वेळेस संपर्क क्षेत्र नसल्यास हजेरी नोंदवता येत नाही. त्यामुळे मजूर कामावर असूनही त्यांची देयके निघणार नसल्याची बाब महत्त्वाची ठरणार होती, त्यावरही स्थानिक परिस्थितीनुसार तोडगा काढण्यात आला आहे.

१२८५ गावांमध्ये कामेच सुरू नाहीत

नाशिक जिल्ह्यात दिवाळीनंतर 1385 पैकी ग्रामपंचायतींपैकी 197 ग्रामपंचायतींमध्येच कामे सुरू आहेत. महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकात सुरु झालेल्या रोहयोच्या कामांबाबत 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला. 2009 मध्ये त्याचे नामकरण करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे केले. मात्र, जिल्ह्यातील 1285 गावांमध्ये सध्या कामेच सुरू नाहीत. दिंडोरी 38, नाशिक 01. सिन्नर 20, निफाड 03, त्र्यंबकेश्वर 29. देवळा 4. सुरगाणा 04, चांदवड 03, मालेगाव 00, कळवण 20, इगतपुरी 10. नांदगाव 19, पेठ 26, येवला 10, बागलाण 10. अशा एकूण 197 ग्रामपंचायतीमध्येच केवळ रोहयोची काम सुरू आहेत

टॅग्स :नाशिकशेतीग्राम पंचायत