Join us

Organic Farming : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, गोंदियातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची भुरळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 5:31 PM

Organic Farming : जमिनीची उत्पादकता ढासळत असल्याने यासर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. 

गोंदिया : रासायनिक खतांचा वाढता (Fertilizer) वापर आणि संकरित बियाणांमुळे शेतीच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्यातुलनेत हाती येणारे उत्पादन फार कमी असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. जमिनीची उत्पादकता ढासळत असल्याने यासर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. 

सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) महत्त्व शेतकऱ्यांना पटू लागल्याने गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) एक हजार शेतकऱ्यांनी या शेतीची कास धरल्याचे दिलासादायक चित्र आहे. अधिक उत्पादन घेण्याच्या लालसेमुळे रासायनिक खतांचा अधिक वापर केला जात आहे. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. या बाबीचे पटू लागल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीच्या लागवडीकडे वळू लागल्याचे चित्र आहे. आत्मा अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीचे जिल्ह्यात २० शेतकरी गट स्थापन करण्यात आले. या २० गटांमध्ये एक हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

शेतकरी गटांना आत्माकडून प्रशिक्षण या गटांना आत्मा अंतर्गत प्रशिक्षण, शेतकरी सहल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सेंद्रिय कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय खतांचे युनिट उभारण्याकरिता साहित्य, उपकरणे आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकऱ्यांना पीजीएसमार्फत प्रमा- णीकरण मिळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादनाबाबत खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध होऊन आत्मविश्वास वाढेल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सर्व शासकीय अधिकारी व व्यापारी गटामार्फत जिल्ह्याबाहेरून वेगवेगळ्या स्तरावरून सेंद्रिय तांदळाला मागणी येत आहे. सेंद्रिय तांदळाची चव चाखलेल्या ग्राहकांकडून प्रकल्प संचालकांना सेंद्रिय तांदळाची मागणी येत आहे. परंतु यावर्षी मागणीला उत्पादित सेंद्रिय तांदूळ पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट ग्राहकांना शेतमालाची विक्री केली जात असल्याने ग्राहकांचे चार पैसे वाचत असून, शेतकऱ्यांचेसुद्धा दलालांच्या घशात जाणाऱ्या पैशांची बचत होत आहे.

२० गावांतील शेतकऱ्यांचा पुढाकार सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढे आलेले एक हजार शेतकरी हे २० गावांतील आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील तीन गावांतील १५० शेतकरी, तिरोडा तालुक्यातील तीन गावांतील १५० शेतकरी, अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील तीन गावांतील १५० शेतकरी, गोरेगाव तालुक्यातील तीन गावांतील १५० शेतकरी, सालेकसा तालुक्यातील दोन गावांतील १०० शेतकरी, आमगाव तालुक्यातील दोन गावांतील १०० शेतकरी, देवरी तालुक्यातील दोन गावांतील १०० शेतकरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन गावातील १०० शेतकरी मागील दोन वर्षापासून सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांचे ५१ गट तयार झाले आहेत. 

हे ही वाचा : सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतातील ह्या दोन पिकांची करा लागवड

टॅग्स :सेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्याशेती क्षेत्रशेती