Paddy Crop Management : भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) हलके व भारी धान लोंबीवर असताना शेकडो हेक्टरवर लष्करी अळीचा प्रकोप वाढला आहे. दिवसा धानाच्या बुंध्याजवळ दडी मारून राहणाऱ्या अळीचे रात्रीच्या सुमारास प्रचंड वेगाने आक्रमण होत आहे. लोंबी कुरतडून शेतात पसरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ७१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली. सद्यस्थितीत धान लॉबीवर असताना लष्करी अळीचे आक्रमण वाढले आहे.
लष्करी अळी धानपिकाचे (Rice Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. त्यामुळे धान परिपक्च झाले असेल तर शेतकऱ्यांनी कापून घ्यावे, अथवा औषधाची फवारणी करावी. लष्करी अळी ही दिवसा लोंबीवर दिसत नाही. ती धानाच्या बुंध्यांजवळ लपून बसते व सायंकाळी धान लोंब्यांवर येऊन लॉच्या कुरतडून टाकते. त्यामुळे उत्पादनात खूप मोठी घट येते.
धानावरील लष्करी अळीसाठी (Lashkari Ali) अद्याप कोणतेही रासायनिक कीटकनाशके शिफारशीत नाही. धान पिकावर आयसोक्लोसेरम १८.१ टक्के, ६ मि.लि./१० लिटर पाणी किवा तसेच इमामेक्टीन बेझोल्ट १.५ टक्के, प्रोफेनोफॉस ३५ टक्के, डब्ल्यूजी १५ मिलीलीटर / १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्यात यावी. - अशोक जिभकाटे, तालुका कृषी अधिकारी, भंडारा.
शेतकऱ्यांनो, असे करा व्यवस्थापन
- शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे.
- किडीची कोषावस्था नष्ट करण्यासाठी भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करून धसकटे जाळून नष्ट करावी.
- टेहाळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवावे.
- पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी पाडाव्यात.
- बेडकांचे संवर्धन करावे.
- उदेकीय स्थितीमधे अळ्या एका बांधीतून दुसऱ्या बांधीत शिरतात.
- त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त बांधीभोवती कीटकनाशकाच्या भुकटीची रेषा आखावी. यामुळे अळ्या भुकटीमध्ये माखून मरतात.